( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील झारणी रोड येथे जामा मशिदीजवळील रस्त्यावर दुपारी संशयास्पदरित्या फिरणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता 7 हजार रुपये किंमतीच्या ब्राउन शुगरच्या 20 पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.54 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. शैबाज बशीर शेख (30, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी शहर पोलिस निरीक्षकांच्या सुचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलिस नाईक वैभव नार्वेकर, पोलिस हेड काँस्टेबल घोसाळे, अमोल भोसले,पोलिस नाईक प्रविण पाटील, आशिष भालेकर, पंकज पडेलकर शहर परिसरात पेट्रोलिंग करत होतेे. तेव्हा झारणी रोड येथे शैबाज बशीर शेख हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडील पिशवीमध्ये सफेद कागदाच्या उग्र वासाच्या 20 पुड्या सापडल्या. ब्राउन शुगर हा अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी शहर पोलीस स्थानकात नेऊन त्याच्याविरोधात गैरकायदा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.