रत्नागिरी: मंडणगड गटामध्ये मौजे धामणी येथील रस्ता मजबुतीकरण, खडीकरण आणि देव्हारे दक्षिण वाडी स्मशानभूमी रस्ता तयार करण्याचे प्रस्ताव, निधी मंजूर होऊन वर्ग झाला तरी काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या कामात शाखा अभियंता ए. ए. सरदेसाई यांनी काम पूर्ण न करता कामाच्या बिलाचा प्रस्ताव सादर करून कार्यालयाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली. पण जि. प. चा हा गोलमाल कारभार असून याच अभियंत्याला पुन्हा कामावर कसे हजर करून घेण्यात आले. झालेल्या अपहाराची जबाबदारी कोणी घेतली का, कोणाच्या दबावामुळे हे झाले, असा सवाल भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला.
जि. प. चे अनेक कारनामे हळुहळू बाहेर येत आहेत. आर्थिक गैरकारभार, हम करे सो कायदा याप्रमाणे कामकाज सुरू असल्याचे आणि ठेकेदारधार्जिणे वातावरण आहे. जनतेची विकासकामे बाजूलाच राहिली आहेत. त्यामुळे असे अनेक अपप्रकार लोक आमच्याकडे सांगत आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले. संबंधित अभियंत्याच्या निलंबनानंतर या वर्षी राज्याच्या एका जबाबदार मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर त्यांनी कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी खुलासा करावा, अशी मागणीही जनतेतून होत आहे, असे त्यांनी सांगितले.
२०१८-२०१९ मध्ये रस्त्याचे काम न करताच त्यातील मलई लाटणाऱ्या या अभियंत्याला कोणाच्या आशिर्वादाने कामावर घेतले आहे, अपहार झाला त्याची रक्कम भरण्यात आली का, तसेच या अभियंत्याला कोणतीही शिक्षा न देता हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला.
२०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये पंचायत समिती मंडणगड गटाकडे जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे पूर्ण झालेल्या कामांचे फोटो, अंतिम मूल्यांकन दाखला, मोजमाप नोंदवही व पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करून झाला. परंतु उपअभियंता सरदेसाई यांच्याकडून जनसुविधा योजनेअंतर्गत मौजे धामणी गावाअंतर्गत रस्ता मजबुतीकरण, खडीकरण (पाच लाख रुपये) आणि देव्हारे दक्षिण वाडी स्मशानभूमी रस्ता तयार करणे (४ लाख रुपये) या कामांचे बिल ३१ मार्च २०२० रोजी कार्यालयाकडे सादर केले आहे. त्यात मोजमाप नोंदवही, मूल्यांकन दाखला, असे परिपूर्ण प्रस्ताव केला आहे. परंतु कामांचे फोटो सादर केले नाही. २३ एप्रिल २०२० रोजी प्रत्यक्ष विस्तार अधिकारी व मी कामांची पाहणी केली असता जाग्यावर काहीच काम झाले नाही असे दिसून आले. याचा अर्थ ए. ए. सरदेसाई यांनी काम पूर्ण न करता कामाच्या बिलाचा प्रस्ताव सादर करून कार्यालयाची दिशाभूल केली आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे जि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी पत्र दिले होते.
मंडणगडमधील शाखा अभियंता जि. प. बांधकाम उपविभाग दापोली युनिट मंडणगड या ठिकाणी कार्यरत असताना २०१८-१९ या आर्थिक वर्षामधील पंचायत समिती मंडणगड गटाकडे जनसुविधा योजनेमधील कामांच्या अनियमततेबाबत निलंबनाचे आदेश जि. प. बांधकाम मुख्यालय, चिपळूण यांनी दिले. त्यानंतर सरदेसाई यांना २०.७.२०२० रोजी जि. प. बांधकाम उपविभाग चिपळूण येथे विभागीय चौकशीचे अधिन राहून जि. प. सेवेत अकार्यकारी पदावर पुनःस्थापित करण्यात आले.
निलंबनानंतर सरदेसाई यांनी खुलासा केला होता. परंतु तो समाधानकारक नसल्याने तो खुलासा जि. प. ने अमान्य केला. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सहाय्यक आयुक्तांमार्फत करण्याचे आदेशही काढण्यात आले. परंतु फेब्रुवारी २०२१ मध्ये सरदेसाई जि. प. बांधकाम उपविभाग चिपळूण येथील कार्यालयीन कामकाजाची गरज लक्षात घेऊन अकार्यकारी पदावरील सेवा या आदेशाद्वारे नियमित (कार्यकारी) करण्यात येत आहे, असे पत्र जि. प. ने दिले होते. त्यामुळे कोणाच्या दबावातून जि. प. असे प्रकार करत आहे, असा सवाल पटवर्धन यांनी केला.
जि. प.च्या ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त
कार्यकारी अभियंता पद हे महत्वाचे आहे आणि त्यासाठी सक्षम अधिकारी यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. पण जिल्हा परिषद कारभार पाहता आणि राजकीय हस्तक्षेप पाहता सद्यस्थितीत या पदाचा कार्यभार श्री. परवडी देण्यात आला आहे. या पदासाठी सिव्हील इंजिनियर पदवी असलेल्या अधिकारी वर्गाची जरुरत असताना या पदासाठी अभियांत्रिकी इंजिनियर श्री. परवडी याना पदाचा पदभार दिला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे, याकडे डॉ. जाखड यांनी लक्ष देऊन गंभीर दखल घ्यावी, असे पटवर्धन म्हणाले.