(रत्नागिरी/प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेमार्फत गुणवंत कर्मचार्यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात येत असतो; मात्र गेल्या पाच वर्षांपासून हे पुरस्कार प्रलंबित आहेत. कोरोनाच्या नावाखाली प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे हे पुरस्कार लांबणीवर पडल्याची चर्चा सुरु आहे. प्रशासकांनी तरी गुणवंत कर्मचार्यांची निवड करुन लवकरात लवकर पुरस्काराचे वितरण करण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या पाच वर्षांच्या दिरंगाई व हलगर्जीपणामुळे गुणवंत व पात्र जिल्हा परिषद वर्ग 3, वर्ग 4 चे कर्मचारी ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कारा’पासून वंचित आहेत. राज्यस्तरावर ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणार्या परस्कारासाठीही अयोग्य व अपात्र व्यक्तींची शिफारस केली जाते. मात्र प्रशासनाने त्यासाठी योग्य निकष लावणे गरजेचे आहे. वास्तविक पुरस्कारासाठी निवड केलेल्या कर्मचार्यांनी नियमित कामापेक्षा काही वेगळे व नावीन्यपूर्ण काम करणे अपेक्षित आहे. ज्यामुळे जिल्हा परिषद कामकाज गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होईल. त्या कर्मचार्यांच्या कामकाजाचा फायदा जिल्हा परिषदेला होणे अपेक्षित आहे. निव्वळ गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट आहेत व संघटनेने शिफारस केलेली आहे म्हणून कर्मचार्यांची निवड करणे अयोग्य आहे.
खातेप्रमुखांनी निवड केलेल्या कर्मचार्यांच्या कागदपत्रांची स्वत: छाननी करावी. तसेच शक्य झाल्यास त्यांच्या मुलाखती घेऊन ते या पुरस्कारासाठी खरेच पात्र आहेत का? याची चाचपणी करणे आवश्यक आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्वत: मुलाखती घेतल्यास पुरस्कारासाठी अयोग्य व अपात्र कर्मचार्यांची निवड होणार नाही. त्यासाठी खातेप्रमुखांनाही सक्त सूचना देणे गरजेचे आहे. तरच खर्या व प्रामाणिक काम करणार्या कर्मचार्याला पुरस्कार मिळू शकतो. जिल्हा परिषदेला गुणवंत कर्मचार्यांना पुरस्कार देण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षात शिक्षक दिन, ग्रामसेवकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेमधील लिपीकवर्गीय कर्मचारी पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत.