रत्नागिरी : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी विभागात आतापर्यंत ३७० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यात ८७ चालक-वाहक असून, आतापर्यंत जिल्ह्यात एसटीच्या ३४ मार्गावर ६८ फेरी झाल्या आहेत. यात वाढ होण्याची शक्यता असून, वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
रत्नागिरी व मंडणगड वगळता जिल्ह्यातील इतर सर्व आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी भरघोस वेतनवाढ जाहीर केल्यानंतर रत्नागिरी विभागात एसटी कर्मचारी कामावर रुजू होताना दिसत आहेत. अनेक कर्मचारी अजूनही संपावर असून, विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामावर रुजू न होण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत ३७० कर्मचारी रुजू झाले आहेत. ८७ चालक, वाहक रुजू झाल्याने एसटी फेऱ्या सुरू झाल्या आहेत. ३४ मार्गावर ६८ फेऱ्या झाल्याने प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.