( देवरुख )
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी आर्थिक परिस्थिती, रोजगाराबाबत असणारी उदासीन परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे १० वी, १२ वी नंतर पुढे शिकत नसल्याचे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत प्रवास करताना आढळून आले. अनेक विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे आहे. मात्र काळानुसार मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असणारे व्यावसायिक अभ्यासक्रम अद्याप रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध नाही.
अनेक विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेमध्ये प्रवेश घेऊन पदवीधर होत आहेत. मात्र त्यानंतर त्यांना नोकरी मिळवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी रत्नागिरीतील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे ड्रेस डिजायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग (डीडीजीएम) कोर्स सुरु करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांना दिले.
“काही महत्त्वाकांक्षी विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, तासगाव, लातूर, धाराशिव इत्यादी ठिकाणी जातात. मात्र मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सर्वांनाच प्रवेश मिळत नाही. तसेच रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसोबतच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेऊन हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यास अनेक विद्यार्थी कौशाल्याधिष्टीत शिक्षण घेतील. व केंद्रशासनाची ‘आत्मनिर्भर भारत’ योजना सफल होण्यासाठी हातभार लागेल,” असे मत श्री. प्रमोद जठार यांनी व्यक्त केले.
यावर बोलताना मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, “आपल्या माध्यमातून आलेल्या अभ्यासपूर्ण निवेदनावर या विभागाचा मंत्री म्हणून मी सकारात्मक विचार करून प्रस्ताव तयार करेन आणि तो लवकरात लवकर परिपूर्ण होऊन मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करेन. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय जलदगतीने घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.” यासंदर्भात मा. आमदार प्रमोद जठार यांचेकडे देवरुख नगरपंचायतीचे मा. उपनगराध्यक्ष व भाजपा देवरुख शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांनी निवेदन सादर करून हा विषय पटलावर आणण्यासाठी प्रयत्न केले.