(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंडचे अध्यक्ष आणि पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांना ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अर्थ समितीचे माजी सभापती तथा संत साहित्याची गाढे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे जाणकार ह. भ. प. शरद दादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार – २०२२ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
गजानन कमलाकर तथा आबा पाटील हे मागील अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रांमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळ वृद्धिंगत करण्यात पुढाकार घेत असतात. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्व साहित्यिकांना आणि साहित्य प्रेमींना एकत्र करत साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, पंचायत समिती सदस्य असताना विविध योजना लोकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पंचायत समिती सभागृहात जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अनेकदा आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारत लोककल्याणकारी योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच सध्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकेच्या विविध योजना, बँकेचे फायदे लोकांच्यापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने बँकेचा विस्तार करण्यात त्यांचा हातभार आहे. म्हणूनच त्यांच्या याच विविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन नुकत्याच झालेल्या ह. भ. प. शरद दादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्यात वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब विचारे आणि डॉ. अनिलकुमार कांबळे यांच्या शुभ हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेन देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यावर मोठी जबाबदारी असून भविष्यामध्ये अजूनही मोठे काम करण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून आतापर्यंत अनेकांनी मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले. त्यामुळेच विविध क्षेत्रात योगदान देणे शक्य झाले असल्याचे मत गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी व्यक्त करून ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य तथा नांदीवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक सुर्वे, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजन बोडेकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण बोरकर, प्रतिष्ठानचे समीर बोरकर, निखिल बोरकर, संदेश महाकाळ यांच्यासह शैक्षणिक, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.