रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला चालना देताना आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इमारत बांधकाम आराखडा सादरीकरण करण्यात आला. बेसमेंट, तळमजला अधिक सहा मजली संपूर्ण कॉर्पोरेट लूक असणारी हि प्रशासकीय इमारत नजीकच्या काळात उभारली जाणार असून, लवकरच या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
आजच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत कशी असेल याचे सादरीकरण करण्यात आले. बेसमेंट, तळमजला अधिक सहा मजली अशी हि इमारत असेल. बेसमेंट, स्टिल्टमध्ये चारचाकी तसेच दुचाकीसाठी पार्किंगची सुविधा राहणार आहे. पहिल्या मजल्यावर विविध विभागांची कार्यालये असतील. दुसरा, तिसरा तसेच चोथ्या मजल्यावर दोन सभापती दालनासह इतर विभागांची कार्यालये राहतील. पाचव्या मजला हा व्हीआयपी मजला असेल. याठिकाणी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दालने असतील. सहावा मजला हा सभागृहासाठी ठेवण्यात आला आहे. याठिकाणी फक्त सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी याना जाण्यास परवानगी असेल. याठिकाणी समिती सभागृह, सर्वसाधारण सभेसाठी वेगळे सभागृह असेल. या सभागृहाची बैठक व्यवस्था हि २०० सिट्सची असेल. सभागृहाला लागूनच पॅन्ट्रीची व्यवस्था असेल. या मजल्यावर सांस्कृतिक सभागृहही राहणार आहे.
सध्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील भागात हि नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. इमारतीला एक प्रकारे कॉर्पोरेट लूक दिला जाणार आहे. इमारतीमध्ये व्हीआयपींसाठी कॅप्सूल लिफ्टची व्यवस्था असेल. तर इतरांसाठी अन्य दोन लीफ्टची व्यवस्था राहणार आहे. इमारतीला म्युरलने सुशोभित करण्यावर भर दिला जाणार आहे. संपूर्ण परिसर सुंदर व विविध प्रकारच्या झाडांनी सुशोभित केला जाणार आहे.