(रत्नागिरी / वार्ताहर)
195 वर्षाचे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आज शनिवार दि. 7 ऑक्टो. 2023 रोजी वाचनालयाने आयोजित केलेला ‘लेखक संवाद’ हा कार्यक्रम म्हणजे साहित्यप्रेमींसाठी खास पर्वणी आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सोप्या भाषेत विज्ञान, कला, आणि साहित्य याची मांडणी करणा-या तसेच ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकांच्या माध्यमातू जगभरातील 50 ग्रंथांचा अभ्यास करुन त्यांचा संक्षिप्त सारांश शब्दबद्ध करणा-या सुप्रसिध्द लेखिका दीपा देशमुख- स्त्रियांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणा-या आणि आपल्या संवाद कौशल्याने विविध विषयांची प्रभावी मांडणी करणा-या ‘आकांक्षा’ मासिकाच्या संपादिका अरुणा सबाने- बहुविध विषय हाताळत एक हजारपेक्षाही जास्त पुस्तकांचे प्रकाशन करणारे मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर- लर्न टू अर्न, आपले भवताल या पुस्तकांचे लेखक व विज्ञान प्रचारक डॉ. नितीन हांडे आणि मुंबईचा संपूर्ण इतिहास शोधून सर्वांसाठी शब्दबद्ध करणारे ‘अज्ञात मुंबई -कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची’ या सुप्रसिध्द पुस्तकाचे सुप्रसिध्द लेखक नितीन साळुंखे हे साहित्यिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून रत्नागिरीतील सुप्रसिध्द साहित्यिक श्री. अभिजित हेगशेट्ये या साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम साहित्य रसिकांसाठी पर्वणी असून या कार्यक्रमात साहित्यप्रेमींनाही या लेखक-प्रकाशकांशी संवाद साधता येणार आहे. तरी या आगळ्या वेगळ्या साहित्यिक मेजवानीसाठी सर्व साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक म. पटवर्धन यांनी केले आहे.