;(संगमेश्वर)
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासीक सभा शनिवार दिनांक ८ ऑक्टोबरला कासवा संगमेश्वर येथे समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष धरवळ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेची सुरूवात श्री. छत्रपती शिवाजी महाराज व श्री. शारदादेवीला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. या सभेचे आयोजन संगम ज्येष्ठ नागरिक संघ, संगमेश्वर व शास्त्री परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, संगमेश्वर यानी संयुक्तरीत्या केले होते.
सभेचे प्रास्ताविक संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेटये यानी केले व स्वागत व आभार शास्त्री परिसर संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर यांनी केले. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या दरम्यान उपस्थित प्रश्नांवर अध्यक्षानी समर्पक उत्तरे दिली. यावेळी राजापूर येथे स्थापन होणाऱ्या संघाबद्दल श्री उल्हास खडपे यानी सभेला माहिती दिली. त्यावेळी राजापूर संघाचे समन्वय समितीमध्ये स्वागत करण्यांत आले. समन्वय समितीचे सचिव दत्तात्रय चाचले यानी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. कोषाध्यक्ष शामसुंदर सावंतदेसाई यानी जमा खर्च सादर केला.
खेड ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. विवेक उर्फ राजन दांडेकर यांची फेस्कॉम कोकण विभागीय कार्यकारिणीत संघटक सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सभेने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या सभेला दापोलीपासून ते राजापूर पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात व्यवस्थित पार पडले. सभेनंतर सह भोजन होऊन सभेची सांगता झाली.