( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील चांदोर येथे घरापासून दूर असलेल्या गोठयात बांधून ठेवलेल्या गाई, शेळयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 38 हजारांच्या शेळया, बोकड चोरीस गेल्याची तक्रार 27 डिसेंबर रोजी पूर्णगड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम भन्या कोकरे (70, शेळीपालन, चांदोरफाटा, तळीवाडी, रत्नागिरी) यांनी आपल्या घरापासून 200 फुट अंतरावर असलेल्या गोठयामध्ये 35 लहान मोठया गाई, बोकड, बकर्या बांधून ठेवलेल्या होत्या. ते सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गायीचे दूध काढण्यासाठी गोठयात गेले असता गोठयाचा सिमेंटचा दरवाजा फोडून 4 शेळी, 1 बोकडाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 9 हजार रुपये किंमतीच्या 5 वर्षाच्या 2 शेळया, 4 वर्षाच्या दोन शेळया, 12 हजार रुपये किंमतीचा बोकड असा एकूण 38 हजार रुपये किंमतीची जनावरे चोरीस गेली. याबाबतची फिर्याद सखाराम कोकरे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.