(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील शेट्येनगर येथील चाळीत बुधवार 18 जानेवारी रोजी पहाटे सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटाने गंभीर भाजलेल्या घरमालक अश्फाक काझी यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री 10 वाजता मृत्यू झाला. त्यांची 4 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यामुळे या स्फोटातील एकूण मृत्युची संख्या तीन झाली आहे.
बुधवारी (18 जानेवारी) पहाटे लिकेज झालेल्या गॅसच्या स्फोटामुळे चाळीचा स्लॅब उडाला होता तर कोसळलेल्या स्लॅबखाली सापडून अश्फाक काझी यांची पत्नी कनिज काझी, सासू नुरूनिस्सा अलजी यांचा मृत्यू झाला होता. तर वडील- मुलगा गंभीर जखमी झाले होते. अश्फाक काझी गंभीर भाजल्याने त्यांना कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. रिक्षा व्यावसायिक असलेल्या अश्फाक काझी यांचा मृत्यू झाल्याने रिक्षा व्यवसायिकांमध्ये शोककळा पसरली आहे.