(रत्नागिरी)
रत्नागिरी गावखडी येथील उच्च शिक्षित तरुणाने शेतीत नवनवीन प्रयोग करत आता मधुमक्षिका पालनामध्येही एक यशस्वी प्रयोग केला आहे. ओमकार रानडे असे या प्रोयगशिल शेतकरी तरुणाचे नाव आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील बीई मॅकेनिकल झालेला तरुण ओमकार गजानन रानडे याने भातशेतीत सगुणा पद्धतीचा वापर, नारळ-सुपारी बागेत मधुमक्षिका पालन, आंबा व्यवसायामध्ये मार्केटिंगमध्ये केलेला बदल फलदायी ठरलेले आहेत.
ओमकार याने सांगितले की, नारळ, सुपारीच्या बागेत सात वर्षांपूर्वी मधुमक्षिका सोडल्या होत्या. त्यानंतर उत्पादनात वीस टक्के वाढ झाली. मधुमक्षिका पालनामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते हे ओमकार यांनी आपल्या बागेतील व्यवस्थापनातून दाखवून दिले आहे. नारळ, सुपारीची सुमारे दोन एकरवर त्यांची बाग आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी मधुमक्षिका पालनासंदर्भात कृषी विभागाकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावखडी येथील घराजवळील नारळ, सुपारीच्या बागेत सातेरी जातीच्या मधमाश्यांच्या चार पेट्या ठेवल्या. मधमाश्या या राहत्या ठिकाणापासून दीड किमी परिसरातच फिरतात. हे लक्षात घेऊन मधमाश्यांच्या पेट्या बागेच्या मध्यभागी आणून ठेवल्या.
राणी माशी ही कायम बाहेर फिरतेच असते. त्यामुळे उर्वरित माशा बागेच्या बाहेर जरी गेल्या तरीही त्या पुन्हा राणी माशी असलेल्या पेटीकडेच येतात. मात्र पावसाळ्यात त्यांची काळजी घ्यावी लागते. मधमाश्यांमुळे परागीकरण व्यवस्थित होते आणि नारळ लागवडीला फायदा होतो. या पेटीमधून वर्षाला सुमारे चार किलो मधही मिळतो.
२०१५ पूर्वी दोन महिन्यांनी १५० झाडातून ९०० नारळ मिळत होते. मधुमक्षिका पालनानंतर त्यात वाढ झाली असून ते ११०० ते १२०० इतके मिळत आहे. नारळ सरासरी १५ रुपयांनी विक्रीला जातो. उत्पादन वाढल्यामुळे आपसुकच उत्पन्नात वाढ झाल्याचे ओमकार रानडे यांनी सांगितले.