(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील खाऊगल्ली येथे कुल्फी विक्री करणाऱ्या दोघा भावांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. धर्मराज मुनक्का निषाद (३४) व प्रदीप निषाद (रा. कोकणनगर रत्नागिरी, मुळ उत्तरप्रदेश) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा अज्ञात संशयिताविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मराज निषाद हा खाऊगल्ली येथे कुल्फी आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करतो. गुरुवारी मुलीची तब्येत बिघडल्याने तो परकार हॉस्पिटल येथे आला होता. तर त्याचा भाऊ प्रदीप हा खाऊगल्ली येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करत होता.
गुरुवारी रात्री प्रदीप हा कुल्फीची गाडी घेवून परकार हॉस्पिटल येथून जात असताना दोघा अज्ञातांनी त्याची अडवणूक केली. तसेच आम्हाला फुकट आईस्क्रिम खायला दे, अशी मागणी केली. आईस्क्रिम देण्यास नकार देताच एका अज्ञाताने त्याची कॉलर पकडून हाताच्या थापटाने मारहाण केली.
यावेळी प्रदीपचा भाऊ धर्मराज हा तेथे आला असता त्यालाही अज्ञात दोघा तरुणांनी दगड फेकून मारून जखमी केले, अशी तक्रार धर्मराजने शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा अज्ञात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील सहा पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.