(रत्नागिरी/प्रतिनिधी)
शहरातील क्रांतीनगर येथे धान्य वाटपाच्या वादातून कार, टेम्पो मधून आलेल्या ८ जणांनी लोखंडी रॉडने दोघांना मारहाण केल्याची घटना 21 एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबुब शेख अली रिफाई (38, क्रांतीनगर, रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबुब रिफाई यांचे महंमदपीर गुलशनअली रिफाई यांच्यासोबत धान्य वाटपाच्या कारणावरुन वाद होते ते मिटलेदेखील होते. मात्र तरीही फिर्यादी मेहबुब रिफाई हे रात्री 11 वा. घराबाहेर बसलेले असताना एक राखाडी रंगाची इको गाडी आणि त्या पाठोपाठ एक जांभळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो आला. त्यामधून 7 जण उतरले. त्यांनी मेहबुब यांना लोखंडी रॉडने डोक्यात, खांद्यावर पाठीवर जोरदार मारहाण केली. या मारहाणीत मेहबुब हे जमिनीवर कोसळले. मेहबुब यांच्यासोबत बसलेली दुसरी व्यक्ती सोडवण्यासाठी गेली असता त्यांनाही लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार मेहबुब रिफाई यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
त्यानुसार पोलिसांनी महंमदपीर गुलशनअली रिफाई, आसिफ गुलशनअली रिफाई, तोहिद महंमद हनिफ मदार, याकुब रोशन मदार, महंमदअली रोशन मदार, नासीर गुलशनअली रिफाई, गफुर मौला शेख, (सर्व रा. क्रांतीनगर) तर महंमद हानिफ (जावई) कोल्हापूर या 8 जणांवर भादविकलम 143, 147, 148, 149, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही.