( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीतील प्रसिद्ध कार्तिकी एकादशीनिमित्त जमलेल्या जत्रेत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवार 5 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कैलास राहूल खाडे (23) व अमोल विजय दगडे (19, ऱा दोन्ही पिंपरी पुणे) अशी दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत होत असलेल्या जत्रेत गर्दी उसळते आणि या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ शकतात याचा विचार करून पोलिस जत्रेत लक्ष ठेवून होते. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जत्रेत संशयास्पदरित्या फिरताना दोघेजण आढळून आले.या दोघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शहर पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावल्याने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.