(रत्नागिरी)
आजचे पुरस्कारप्राप्त व्यक्ती उत्तुंग व समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघ आपल्या ज्ञातीबांधवांनाच नव्हे तर समाजातील चांगल्याचे कौतुक करत समाजातील चांगल्या व्यक्तींना पुरस्कार देत आहे, हे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. कोणाच्या पोटी जन्माला यायचे ते परमेश्वर ठरवतो. पण कर्तुत्व आपल्या हातात आहे. पुरस्कार विजेते हलाखीच्या परिस्थितीत, मध्यम कुटुंबातून पुढे आलेले आहेत. प्रचंड कष्ट करून आपल्या क्षेत्रात पुढे जाऊन शकतो, हे या व्यक्तींना दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक व पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
रविवारी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात शानदार कार्यक्रम रंगला. श्री. प्रभुदेसाई म्हणाले की, पुरस्कार या शब्दाची फोड करून सांगताना प्रभुदेसाई म्हणाले की ही विजेते परिपूर्ण, वाचन, अभ्यास रोज केला पाहिजे, साधना, का यावरून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी आणि राहणीमान चांगले असले पाहिजे. पुरस्कार विजेत्यांनी आपापल्या क्षेत्रात या सर्वाला न्याय दिला आहे, त्यामुळे ते पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीतर्फे माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली जाते. शाल, पुस्तक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच दिव्यागांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देतो. कऱ्हाडे ब्राह्मण संघाला ९५ वर्षे झाली असून संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यानिमित्त नवी वास्तू उभारण्याचा संकल्प आहे. त्याकरिता देणगीदारांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी देणगीदारांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. रेणुका मांदुस्कर यांनी केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी संघाचे आभार मानताना आता या पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. आमच्या छोट्या कार्याची दखल संघाने घेतली याबद्दल खूप आनंद वाटतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बोधकथा सांगताना राजा व चार राण्यांची गोष्ट सांगितली. मृत्यूनंतर संपत्ती उंबऱ्यापर्यंत, कुटुंबीय अंगणापर्यंत, स्थावर मालमत्ता जमीनजुमला, झाडेझुडे स्मशानापर्यंत आणि तुम्ही केलेले सत्कर्म शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे सत्कर्म केले पाहिजे, असे आवाहन सदानंद ठाकुरदेसाई यांनी सांगितले. डॉ. जेवळीकर, श्री. वाडदेकर यांनी संघाचे कौतुक केले. पत्रकार सुरेश सप्रे यांनी सांगितले की, पत्नीच्या सहकार्य व काही कटू निर्णयामुळे मी दुर्धर आजारातून बरा झालो व २५ वर्षे काम करतोय. कऱ्हाडे संघाने दिलेला दर्पण पुरस्कार मी विसरू शकत नाही. महेश गर्दे यांनीही मी रक्तदाता सूची, सिद्धाई फूड्सच्या माध्यमातून महिला बचत गट व ग्रामीण भागातील अनेकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान
आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रेय तथा दत्तराज वाडदेकर (देवरुख), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सदानंद ठाकुरदेसाई (मोरोशी, ता. राजापूर), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. गणेश खेर (भू, राजापूर) धन्वंतरी पुरस्कार डॉ. शाम जेवळीकर (रत्नागिरी), दर्पण पुरस्कार सुरेश सप्रे (देवरुख), उद्योजक पुरस्कार महेश गर्दे (रत्नागिरी), उद्योगिनी पुरस्कार शिल्पा तीन करकरे (तुरळ, ता. संगमेश्वर) यांना प्रदान करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार खो-खो पटू सायली कर्लेकर (रत्नागिरी) ही रोहा, रायगड येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करत होती. त्यामुळे ती येऊ शकली नाही, तिच्यावतीने आईने हा पुरस्कार स्वीकारला. या सर्व पुरस्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करून संघाने दखल घेतल्याबद्दल आभार मानले.