(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाहन चालवण्यास एखादी व्यक्ती फिट आहे की नाही? किंवा एखादा चालक अनेक प्रवाशांना घेऊन जाताना तो शारीरिक, मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही याची चाचणी घेतली जाते. म्हणजेच त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. हे वैद्यकीय प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. आता नागरिक व परिवहन संवर्गातील वाहनचालक, खासगी वाहन चालवणाऱ्याना या प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आह़े.
रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची ऑनलाईन सुविधा करण्यात आली आह़े. या ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्रचा लाभ घेता येणार आहे.
एमबीबीएस पदवीपाप्त डॉक्टरांनी केलेल्या अर्जानुसार आरटीओच्यावतीने लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात येत़ो. त्यानुसार अशा मान्यता मिळालेल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रांची सोय आरटीओच्या वतीने करण्यात आली आह़े. सध्या प्रादेशिक परिवहन विभागाचे सर्वच काम ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी देखील केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे.
वयाच्या चाळीशी नंतर नागरिकांना आजारांची समस्या उद्भवत़े, अशा अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असत़े. वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे. आता ऑनलाईन सुविधेमुळे आरटीओ कार्यालय परिसरात वावरणाऱ्या एजंटाना आळा बसणार आहे.