( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाईन नोंदणीतील पळवाटा शोधत चेसीस नंबरमध्ये जादा डॉट (स्टार किंवा अन्य कॅरेक्टर) टाकून वाहनांची बोगस नोंदणी केल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिल्हयातील 136 वाहनांचा समावेश आहे. मात्र या बोगस नोंदणीमुळे शासनाचा सुमारे 17 लाख 49 हजारांचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे 8 लाख 79 हजारांचा महसूल बुडाला आहे. याप्रकरणी 3 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यात जिल्हयात 136 वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी 109 जणांनी टॅक्स भरला आहे. त्यांची अधिकृत नोंदणी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. एकूण 17 लाख 49 हजार टॅक्स भरणा झालेला नाही तर अनेकांनी पसंती क्रमांकासाठी 8 लाख 79 हजार रुपये भरले होते. या नंबरसाठी 30 दिवसांची मुदत असते. ती रक्कम परस्पर वापरल्याचे चौकशीत समोर आले आहे. ज्या 22 वाहन धारकांनी टॅक्स भरलेला नाही, त्यांना पुढील सात दिवसांची मुदत देत अंतिम नोटीस बजावली आहे. अन्यथा या वाहनांची नोंदणी रद्द होवून ती वाहने भंगारात काढण्याची वेळ येणार आहे.
बीडमध्ये वाहनांची बोगस नोंदणी होत असल्याची तक्रार परिवहन कार्यालयात करण्यात आली होती. या तक्रारीवरुन प्रत्येक जिल्हयात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात मोठया प्रमणात वाहनांची बोगस नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
2007 साली वाहन नोंदणी ऑनलाईन करण्यात आली. काही एजंटना रजिस्टेशनसाठी लॉगिन आयडी देण्यात आला. त्यावरुन त्या, त्या एजंटाकडून वाहनांची नोंद होते, मात्र काही हुशार एजंटांनी दुसर्याचा आयडी वापरला. एवढेच नाही तर ऑनलाईन नोंदणीत पळवाट शोधून वाहनांच्या चेसीस नंबरमध्ये डॉट टाकून (वेगळा टॅग किंवा हॅश असे) असे वापरुन नोंदणी केली.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तीन कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि एकाचा समावेश आहे.