(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील मोठ्या रकमेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवणाऱ्यांवर रत्नागिरी नगर परिषदेने कारवाई सुरू केली आहे . पाणीपट्टी थकीत ३५० ग्राहकांचे प्रकरण लोक अदालतमध्ये दाखल करण्यात आले आहे . सुमारे ३० नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत . त्याचबरोबर घरपट्टी थकवणाऱ्या १९२ मालमत्तांवर जप्ती करण्यात आली आहे .
रत्नागिरी शहरात १० हजार २८८ नळजोडण्या आहेत . मार्चअखेर यांच्याकडून पाणीपट्टीचे ४ कोटी ४८ लाख रुपये वसूल करायचे होते . यातील केवळ २ कोटी ७८ लाख रुपयेच वसुली झाली आहे . हॉटेल , लॉज , अपार्टमेंट अशा ३५० मोठ्या थकीत ग्राहकांची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रकरणे लोक अदालतमध्ये पाठवण्यात आली आहेत . शहरात २९ हजार ८८ इमले किंवा मालमत्ता असून , त्यांच्याकडून मार्चअखेर १४ कोटी रुपये घरपट्टी वसुली करायची होती . त्यातील केवळ ८ कोटी ७० लाख रुपयांची वसुली झाली आहे . मोठ्या रकमेच्या थकीत सुमारे १९२ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत .