(रत्नागिरी)
कोकणातील कातळशिल्प आणि त्यांचा जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीतील समावेश हा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र लवकरच रत्नागिरी शहरात सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात संशोधन विभागासोबत कातळशिल्प विषयाबाबत सर्वांगीण माहिती उपलब्ध व्हावी, म्हणून प्रदर्शन आणि माहितीचे एक स्वतंत्र दालन असणार आहे.
कातळशिल्प शोधाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार) यांच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आयआयटी मद्रास आणि निसर्गयात्री संस्थाद्वारा संचालित आयआयटी हैद्राबाद, जेएनयू दिल्ली यांच्या सहयोगाने संशोधन केंद्र उभे राहात आहेत.
दक्षिण कोकणातल्या सड्यांवर शेकडोंच्या संख्येने आढळून येत असलेली ही कातळशिल्प अखंड मानवासाठी महत्त्वपूर्ण वारसा ठेवा आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ संभाव्य यादीत स्थान मिळविलेली ही कातळशिल्प, त्यांचे आकार, पसारा आणि त्यामागील आशय, विषय या बाबतीत जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ही कातळशिल्प नक्की कोणत्या कालखंडात निर्माण केली? कोणी निर्माण केली? कशी निर्माण केली ? त्या मानवाची त्यांची जीवनशैली कशी होती? अशा अनेक प्रश्नांची नक्की उत्तरे ज्ञात नाहीत. ही उत्तरे शोधण्यासाठी वरील संस्थांर्ते प्रयत्न चालू आहेत.
या प्रकल्पांतर्गत कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र लवकरच सुरू करण्यात येत आहे. या केंद्राकरिता सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे आणि टीम निसर्गयात्री मेहनत घेत आहेत.निसर्गयात्री संस्थेर्ते गेल्या १ वर्षांपेक्षा अधिक काळ चालू असलेल्या या कामाची दखल विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने घेतली. कोकणातील कातळशिल्प संशोधन या प्रकल्पाला राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प म्हणून त्यांनी मान्यता दिली. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भारतातील अग्रगण्य संस्था आणि डॉ. विजय भटकर, डॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयातील तज्ज्ञ मंडळी सोबत जोडली गेली आहेत.
आमच्या मेहनतीला मूर्त स्वरुप : सुधीर रिसबूड
गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळ चालू असलेल्या आमच्या मेहनतीला आता हळुहळू मूर्त स्वरूप येत आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचे निसर्गयात्रीचे अध्यक्ष सुधीर रिसबूड यांनी सांगितले.