( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरातील आरोग्य मंदिर येथे मैत्रिणीनेच मैत्रिणीच्या घरात चोरी केल्याने मैत्रीच्या नात्यात विश्वासघात केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महीलेने 6 तोळे आणि 50 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. नंदिनी मोहिते (टिके, सध्या राहणार अभ्युद्ययनगर रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आह़े. याबाबतची तक्रार कोमल श्याम पाटील (32, ऱा आरोग्य मंदिर रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल व नंदिनी या दोघी मैत्रिणी होत्या. मैत्रीच्या नात्याने घरात येणे जाणे सुरू होते. यातून कोमल हिच्या आरोग्य मंदिर येथील फ्लॅटची चावी नंदिनी हिने मिळवली होत़ी. ऑक्टोबर 2022 ते 26 नोव्हेंबर 2022 या दरम्यानच्या काळात नंदिनी हिने कोमल हिच्या घरातील 6 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 60 हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली. आपले दागिने व रक्कम सापडत नसल्यामुळे कोमल याना नंदिनी हीचा दाट संशय आला. कोमल यांनी शहर पोलीस स्थानकात दागिने आणि पैसे गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास करत नंदिनी हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने कबुली दिली. तिच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आल़ा. नंदिनी हिच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. रविवार 27 नोव्हेंबर रोजी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने नंदिनी हिला पोलीस कोठडीत सुनावली.