(रत्नागिरी/प्रतिनिधी)
दोनच दिवसापूर्वी रत्नागिरीतील दोन मुली घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या बेपत्ता असल्याची तक्रार घरच्यांनी केल्यानंतर पोलिसांनी त्या दोन्ही मुलींना एका मुलीसोबत नागालँड येथे ताब्यात घेतले आणि रत्नागिरीत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तशीच घटना रत्नागिरीत घडली आहे. एका अल्पवयीन मुलगा पळवून नेल्याची फिर्याद पोलिस स्थानकात नातेवाईकांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा मुलगा एका अल्पवयीन मुलीसह पंढरपूर येथे सापडला.
सविस्तर वृत्त असे की, बाहेर जातो असे सांगून एक मुलगा घरातून बाहेर पडला होता. तो घरी न आल्यामुळे मुलाला पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना तांत्रिक माहिती व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली. या तपासादरम्यान सांगली येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची फिर्याद नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली होती. तिचा सांगली पोलीस शोध घेत होते सांगलीतील पोलिसांना या मुलीच्या मोबाईलचे लोकेशन सापडत नव्हते. मात्र रत्नागिरीच्या पोलिसांना मुलाचे लोकेशन मिळाले. हे लोकेशन पंढरपूर येथे असल्याचे आढळून आले. दरम्यान, रत्नागिरी पोलिस पंढरपूरला रवाना झाले. पंढरपूरला गेल्यानंतर तपासात मुलासोबत एक अल्पवयीन मुलगीही असल्याचे लक्षात आले. शनिवारी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात आणले.
यानंतर या दोघांची माहिती उघड झाली. हा अल्पवयीन मुलगा काही महिने शिक्षणासाठी सांगलीत होता. यावेळी त्याची सांगलीतील मुलीशी ओळख निर्माण झाली होती. पुढे हा मुलगा रत्नागिरीत आल्यावर दोघांच्यात दरी निर्माण झाली होती. मात्र ती दोघही एकमेकांच्या संपर्कात होते. हा मुलगा काही दिवसांपूर्वी सांगलीत जाऊन त्या मुलीला भेटून आला होता. त्यानंतर ते दोघेही पंढरपूर येथे गेले होते. या ठिकाणी रत्नागिरी पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाल्यावर त्या दोघांनाही पोलिसांनी रत्नागिरीत आणले गेले.
ही कामगिरी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव, प्रसाद घोसाळे, पोलीस नाईक वैभव नार्वेकर, अमित पालवे, चालक विशाल अलीम यांनी केली. बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध लावल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा 1500 रुपये तर पोलिस हवालदारांना 500 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले.