(विशेष प्रतिनिधी / रत्नागिरी)
रत्नागिरीतील दोन रिक्षा व्यावसायिकांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. दोघानाही रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आशिष संजय किडये (29, ऱा धनजीनाका रत्नागिरी), विनेश मधुकर चौगुले (45, ऱा कसोप रत्नागिरी) अशी दोघाची नावे आहेत. ते बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची चैन, अंगठी, पैशाचे पाकिट गाडीची चावी घेऊन फरार झाले. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, पर्यटक बनून आलेल्या तिघांनी आपल्याला गणपतीपुळे याठिकाणी जायचे असल्याचे रिक्षा चालक आशिष किडये याना सांगितल़े. त्यानुसार आशिष याने 3 पर्यटकांना गणपतीपुळे याठिकाणी नेले. गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने परतत असताना त्यांनी आशिष याला प्रसाद म्हणून लाडू खाण्यास दिला. लाडू खाल्ल्यानंतर आशिष हा बेशुद्ध पडल़ा. यानंतर तिघांनी त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम, एक तोळ्याची सोन्याची चैन लुटून फरार झाले.
दरम्यान आशिषला घरी येण्यास दुपारी उशीर झाल्यामुळे वडीलांनी शोधा शोध सुरू केल़ी यानंतर आशिष हा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास परटवणे साईमंदीर ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत रिक्षाचालक विनेश चौगुले यांना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळेसाठी भाडे होते. तिकडे भाडे घेवून जात असताना सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विनेश हा चंपक मैदान याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याच्याकडीलही सोन्याची चैन, पाकिट, रिक्षाची चावी आदी लुटून फरार झाले. दोघेही बेशुद्ध असल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाह़ी. मात्र या प्रकाराने सारे रिक्षा व्यवसायिक सिव्हील हॉस्पिटल येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.