( रत्नागिरी )
विनाकारण एका गरीबाला कान फुटेस्तोवर मारहाण करून ‘दबंग’ गिरी करणाऱ्या रत्नागिरीतील एका ट्रॅफिक पोलिसाला दबंगगिरी चांगलीच भोवणार आहे. या विषयाची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. शिवाय या पोलिसाबद्दल तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
त्याचे असे झाले की, शहराजवळील वेतोशी गावातील रमेश झोरे हे दुध विक्रीसाठी रत्नागिरी शहरात येतात. मंगळवारी 26 जुलै रोजी सकाळच्या वेळेत ते आपल्या घरी जात होते. यावेळी पोलिस साळवी स्टॉप येथे खुर्चीचा व्यवसाय करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी करत होते. एवढ्यात हा दूध विक्रेता झोरे आपल्या दुचाकीवरून त्या ठिकाणी पोहोचला. त्याने पोलिसांना विनंती केली. ‘साहेब, जाऊ दे ना त्यांना, गरीब आहेत बिचारे’ असे म्हणून तो पुढे निघून गेला. आपल्या बाबतीत पुढे काही होईल याची थोडीही त्याला कल्पना नव्हती.
झोरे यांच्या या बोलण्याचा राग मनात धरून ट्रॅफिक हवालदार प्रशांत बंडबे यांनी त्याचा साळवी स्टॉप वरून पाठलाग सुरू केला आणि टीआरपी येथे त्याला अडवले. गाडीवरून उतरून झोरे यांच्या दोन – चार कानशिलात ठेवून दिल्या. एवढ्या जोरात त्यांनी मारले की, त्यांच्या उजव्या कानातून रक्त वाहू लागले. तशाही परिस्थितीत या ट्रॅफिक हवालदाराने त्यांना साळवी स्टॉप येथे पुन्हा आणले. तिथे त्याचे फोटो काढले. यावेळी झोरे पोलिसाना म्हणाले, साहेब माझ्या कानातून रक्त वाहतंय, याचा खर्च कोण करणार? यावर पोलिसाने उद्धटपणे उत्तर देत म्हंटले, मी कसला देणार खर्च, मी कुठे तुला मारलंच नाही. यानंतर बिचारे झोरे स्वखर्चाने डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी त्यांना सांगितले की, तुमच्या कानाचा पडदा फाटला आहे. या प्रकाराने ते घाबरले आणि त्यांनी पत्रकारांना ही हकीकत सांगितली. बिचाऱ्या झोरे यांनी काय गुन्हा केला होता. ‘साहेब, सोडा’ त्यांनी हा शब्द वापरला म्हणून एवढी शिक्षा का?
याबाबत रत्नागिरी शहरातील वाहतूक पोलिस निरिक्षक शिरिष सासणे यांच्याशी बोलणे केले असता आम्ही योग्य ती कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण, प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. आता वाहतूक पोलीस निरीक्षक शिक्षा करणार की, त्यांना पाठीशी घालणार हे लवकरच दिसून येईल.
चोरांना पकडण्यासाठी एवढा का पाठलाग करत नाहीत?
रत्नागिरी शहरात भरदिवसा घरफोडीचे प्रकार घडत आहेत. पण त्या घरफोडीतील चोरट्यांना पकडायला पोलिसाना महिने महिने लागतात. मात्र स्थानिक गरीब बिचाऱ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना अशाप्रकारे त्रास देण्यापेक्षा चोरांचा पाठलाग करून पकडा, तिथे धाडस दाखवा, तरच तुमचं खर कौतुक होईल. गरिबांना धाक दाखवून काय सिद्ध करणार आहात असा सवाल नागरिकांतून उमटत आहे.