( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शांत असलेल्या रत्नागिरीत क्राईमच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. क्राईमच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत आहे. बुधवार 30 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास भरवस्तीत तरुणावर 3-4 जणांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. डोक्यावर लादी फोडून, हातावर वार करुन तरुणाला जखमी केले आहे. या हल्ल्यात नागेश प्रकाश गजबर (27, कुवारबाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर बाजारपेठेत खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, कुवारबाव येथे नागेश गजबर याला ओळखीच्या 3-4 तरुणांनी पर्याची आळी येथे फोन करुन बुधवारी रात्री 8 वा. बोलावून घेतले. नागेश तेथे आल्यानंतर पैशाच्या देवाण घेवाणीतून वाद झाला. एका तरुणाने त्याच्या डोक्यात लादी घातली. तर दुस़र्याने धारदार कोयतीने डोक्यावर आणि हातावर सपासप वार केले. हल्ला झाल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरु झाला. लोकांच्या गोंगाटाने हे मारेकरी पळून गेले. नागेश हा रक्ताच्या धारोळयात कोसळला. येथील नागरिकांनी त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच ही घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलीसांचा धाक राहिलेला नाही असे नागरिकात बोलले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सारा प्रकार कैद झाला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.