(रत्नागिरी)
जननायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थ भारत घडतो आहे. परंतु या लोककल्याण योजना रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी आपला हक्काचा खासदार नाही, हे शल्य आहे. हे शल्य मिटवून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. आपला खासदार कमळ चिन्हावर निवडून आला पाहिजे, याकरिता मनोवृत्ती तयार करा, असे सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. येथे आयोजित गरीब कल्याण संमेलनात ते बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात झालेल्या या संमेलनास पाचशेहून अधिक भाजपा कार्यकर्ते, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. ॲड. पटवर्धन म्हणाले की, आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. केंद्रातील भाजपा शासनाच्या असंख्य लोककल्याणकारी योजना आपण जिल्ह्यात पोहोचवून लाभार्थ्यांच्या मनात बिंबवल्या पाहिजेत. यातूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपाची असेल, याची खात्री बाळगा.
राज्य शासनावर टीका करताना ॲड. पटवर्धन म्हणाले की, हे भाजपाचे १०६ आमदार बाजूला सारून कुटील कारस्थान करून सत्तेचे राजकारण करत महाविकास आघाडी स्थापन केली. परंतु हे दळभद्री सरकार असून फक्त गादी उबवणारे शासन आहे. यांचे मंत्री तुरुंगाची हवा खात आहेत. बिन खात्याचा मंत्री आहे त्याचा पगार जनतेच्या पैशातून करणार. वल्गना करत जनतेच्या भावनांशी हे खेळत आहेत. हे शासन बदलण्यासाठी जनता उत्सुक आहे, हे अनेकदा समोर आले आहे. कोविडच्या काळात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे परस्पर विरोधी निर्णय, हॉस्पीटलची वाईट स्थिती आपण पाहिली. हे राज्य सरकार विकलांग आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दलही राज्य सरकारवर त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ६२ कोटीची नळपाणी योजना दिली. पण अजूनही ती सुरू करणे सत्ताधाऱ्यांना जमले नाही. पालकमंत्र्यांनी बेकायदा हॉटेल बांधले. हॉटेल पाडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पालकमंत्र्यांना त्याची लाज वाटत नाही. रत्नागिरीच्या जनतेला एसटी स्टॅंडची गरज आहे. तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पैसे गोळा करून देतो, अशी टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली. निवळीच्या पुढे जाणारा रस्ता, गावातील रस्ते वाईट अवस्थेत आहेत, असा खरपूस समाचार ॲड. पटवर्धन यांनी घेतला.
या वेळी व्यासपीठावर ॲड. बाबा परुळेकर, ऐश्वर्या जठार, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, सचिन वहाळकर, यशवंत वाकडे, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, मुन्ना खामकार, प्रमोद अधटराव, शहराध्यक्ष सचिन करमकर, तालुका सरचिटणिस उमेश कुळकर्णी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, डॉ. संतोष बेडेकर आदी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकणार
बहुमत नसताना राज्य सभेसाच्या जागा जिंकून भाजपाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे वस्त्रहरण केले. येत्या २० जूनला होणाऱ्या भाजपा विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकणार असल्याचा दावा ॲड. पटवर्धन यांनी या वेळी केला. आपले आमदार प्रसाद लाड हे सुद्धा पुन्हा आमदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.