[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
गेले अनेक दिवस रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेला १०० फुटी ध्वजस्तंभावर झेंडाच फकडत न्हवता. यावर सामाजिक, राजकीय संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने ही देण्यात आली. मात्र साधारण दोन वर्षाचा काळ उलटल्यानंतर दुरुस्तीचे काम शासनाकडून हाती घेण्यात आले. शुक्रवारी मुंबई येथून मागविलेल्या क्रेनच्या साहाय्याने करण्यात आली. यावेळी क्रेन मालकाने यासाठी कोणताही मोबदला न घेता, आपली राष्ट्रप्रेम दाखवून दिली आहे. या स्तंभाच्या दुरुस्तीसाठी क्रेन आणण्याला सुमारे पाच लाख भाडे लागणार होते ते नाकारल्याने या क्रेन मालकाचे कौतुक होत आहे.
कोरोना काळामुळे मागील सुमारे २ वर्षांपासून या ध्वज स्तंभावर ध्वज फडकवला न गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या ध्वज स्तंभावरील केबल देखील तुटल्याने नवीन ध्वज फडकावण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी अवाढव्य क्रेनची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने चौकशी करता अशी क्रेन मुंबई – गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे समजले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. या क्रेनचे ८ तासांचे भाडे तब्बल ५ लाख रुपये इतके आहे.
मात्र, तिरंग्याच्या आणि देशाच्या प्रेमापोटी हे भाडे मुंबईतील सुनील स्टील कॅरिअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या मालकाने नाकारले. मालकाच्या राष्ट्रप्रेमापोटी अनेक स्तरावरून त्यांचें कौतुक ही होत आहे. क्रेनच्या सहाय्याने ध्वजस्तंभाच्या टोकाला जाऊन केबल व लाईटची दुरुस्ती करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही क्रेन रत्नागिरीत दाखल झाली आणि कामाला सुरुवात देखील करण्यात आली. या कामासाठी जयस्तंभ येथे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. क्रेनचे काम संपल्यानंतर या स्तंभावरील उर्वरित दुरुस्ती व अन्य किरकोळ कामे ही करण्यात येत आहेत. येत्या १५ ऑगस्टला या १०० फुटी स्तंभावर राष्ट्रध्वज फडकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना जिल्यातील एकमेव स्तंभावर राष्ट्रध्वज फडकताना पाहायला मिळणार आहे.