( रत्नागिरी )
रत्नागिरी विमानतळावर ८० सीटर विमाने उतरवण्यासाठी आवश्यक असलेली धावपट्टी उभारण्यात आली आहे. आता पुढील १५ दिवसात नाईट लँडिंगची सुविधा उभारली जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह उपस्थित होते. रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होण्यासाठी गतीमान कार्यवाही सुरू आहे. हे विमानतळ सुरु झाले की आपसुकच उद्योजक येण्यास चालना मिळणार आहे. येथील विमानतळावर ८० सीटर विमान उतरवण्यासाठी पुरक धावपट्टी उभारण्यात आली आहे. ही बाब सोयीची ठरणार असून भविष्यात त्याचा फायदा येथील उद्योगांना चालना देण्यास मदत होईल. रत्नागिरी विमानतळावर रात्रीच्यावेळी या विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली नाईट लॅण्डींगची सुविधा येत्या १५ दिवसांत उभारली जाईल. १०० मीटरची कंपाऊडवॉल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. टर्मिनल इमारतीसाठीही २१ कोटी रुपये मिळालेले आहेत. यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. मागील अडीच वर्षे ही प्रक्रिया रखडली होती. जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी ही प्रक्रिया २ महिन्यात ती पूर्ण केली. तसेच जागेपोटी प्राप्त झालेल्या ६० पैकी ४७ कोटी रुपये संबंधित जमीन मालकांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. दहा लाखापासून १ कोटींची रक्कम जागेपोटी तेथील लोकांना मंजूर झाली आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे या विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.