(रत्नागिरी)
वाढत्या शहरीकरणामुळे रत्नागिरी शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी सुसज्ज आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत. शहरातील पार्किंगच्या जागा खुल्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
रत्नागिरी शहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहरानजिकच्या बहुतांश गावातून ग्रामस्थ आपली वाहने घेऊन शहरात येतात. त्यामुळे दिवसा वाहनांची संख्या दुप्पट होते. रत्नागिरी शहरातील रस्त्या प्रशस्त असले तरी मुख्य मार्ग एकच असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळते. वाहतूक कोंडीतून रत्नागिरीकरांची सुटका करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व मार्गांवर रस्त्यावर पट्टे मारण्याची सुचना पालिकेला करण्यात आली आहे. मारुतीमंदिर, जेलरोड, रामनाका, गोखलेनाका, लक्ष्मीचौक येथील सिग्नल तत्काळ सुरु करण्याच्या सुचना पालिकेला देणार असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. शहरात ज्या पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण आहे, त्या जागा तात्काळ मोकळ्या करुन तेथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पार्किंगसाठी जागा दिल्यानंतर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य मार्गावर चारचाकी वाहने पार्किंग होत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. मुख्य मार्गावर वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता वाहतूक पोलिसांनी घ्यावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार आहे.