(मुंबई)
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याकारणाने मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७३.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.