मुंबई : रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून चालना देण्यासाठी मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी रत्नागिरी येथे मंत्री उदय सामंत यांच्या प्रभागनिहाय बैठकाच्या कार्यक्रमात गेल्या आठवडयात भेट घेतली होती. त्यावेळी मांडवी कुरणवाडा येथे क्रुझ टर्मिनल करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या समावेत भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, भंडारी समाजाचे अध्यक्ष रूपेन्द्र शिवलकर व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. निवेदनाची मागणी ऐकुन घेतल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी ५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित केली. त्यानुसार आज मंगळवार दिनांक ५ रोजी मुंबई येथे बैठक संपन्न झाली.
याबैठकीमध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे सी.ई.ओ. श्री. अमित सैनी यांनी मांडवी कुरणवाडा येथे क्रुझ टर्मिनल बनविण्यासाठी सहमती दर्शविली. सध्या भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलसाठी सर्व्हे सुरू आहे. परंतु त्याठिकाणी तटरक्षक दलाचा सैनिकी तळ होणार आहे व मिरकरवाडा येथील रस्ता मोहल्ला व मशिद यामुळे भविष्यात रस्ता रूंदीकरण अशक्य आहे. त्याठिकाणी मिरकरवाडा मासेमारी बंदरामुळे पर्यटन वाढीसाठी कोणताच वाव नाही.
यासर्व बाबींचा सखोल विचार करून हे क्रुझ टर्मिनल मांडवी कुरणवाडा याठिकाणी उभारण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ प्रयत्न सुरू होणार आहेत. CWPRS या पुण्याच्या संस्थेकडून येथील भौगोलिक सर्व्हे केला जाणार आहे. क्रुझ टर्मिनलसाठी लागणारी आवश्यक पाण्याची खोली कुरणवाडा याठिकाणी आहे. ब्रिटीशकाळामध्ये याठिकाणी जेट्टी बांधण्याचा सर्व्हे झाला होता. राजीवडापासून मांडवीपर्यंत बंधारा व कॉकिटचा रस्ता बनविला जाणार आहे. मांडवी जेट्टीवरून पॅरासिलींगसाठी व बोटिंगसाठी तेथील स्थानिक पर्यटन संस्थेला मंजुरी दिली जाणार आहे. त्यासाठी त्याठिकाणचा भौगोलिक भागाचा सखोल सर्व्हे केला जाणार असल्याचे एम. एम. बी.चे सी. ई. ओ. श्री. अमित सैनी यांनी सांगितले आहे.
मा उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे क्रुझ टर्मिनलच्या कामाला गती मिळणार असून अडचणीत सापडलेल्या रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेला या विकास कामामुळे चालना मिळेल. मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार असून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत. रत्नागिरीतील विकास कामांसाठी मंत्री उदय सामंत यांच्याकडे जाण्यास मला कोणताच कमीपणा नाही, असे मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री. राजीव किर यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांना विनंती करून केंद्रीय मंत्री यांच्यासमवेत दिल्ली येथे लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे श्री. किर म्हणाले.
या विकास कामासाठी पाठपुरावा करावा म्हणून स्थानिक नगरसेवक श्री. नितीन तळेकर, नगरसेवक श्री. बंटी किर, नगरसेविका सौ. रशिदा गोदड, नगरसेविका सौ. अस्मिता चवडे यांनी मंत्री महोदयांना विनंती पत्र दिले आहे. या बैठकीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नागरिकांचे समुद्र सफारीचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या बैठकीला मंत्री उदय सामंत यांच्या समवेत एम. एम. बी.चे सी. ई. ओ. श्री. अमित सैनी, एम. एम. बी.चे अधिकारी श्री. बडीये, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री. राजीव किर, उपाध्यक्ष नगरसेवक श्री. नितीन तळेकर, माचाळ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्री. विवेक सावंत, भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. रूपेंद्र शिवलकर आदी उपस्थित होते.
सर तुम्ही ही बातमी दिली आहे त्यात मांडवी कुरणवाडी असा उल्लेख केला आहे तो पत्ता असा आहे की पेठकिल्ला कुरणवाडी असा आहे.