( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देणारी भारती शिपयार्ड पुन्हा सुरू होणार असल्याने युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यासाठी याआधीही प्रयत्न करण्यात आले. मात्र कंपनी सुरू होऊ शकली नाही. आता रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री झाल्यानंतर हा बंद पडलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचालीना वेग आला आहे. बुधवारी मंत्रालय मुंबई येथे मिऱ्या – रत्नागिरी येथील भारती शिपयार्ड कंपनी सुरू करण्याबाबत राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे येथील बंद असलेली ही कंपनी पुन्हा सुरू होण्याबाबत रत्नागिरीकर जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मंत्रालयात झालेल्या या चर्चेच्यावेळी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, परेश सावंत, निशांत सावंत, कंपनीचे शिष्टमंडळ व सर्व संबंधित उपस्थित होते.
२०२१ मध्ये कर्मचारी, ठेकेदार यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे भारती शिपयार्ड कंपनी सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच न्यायालयाने कोणत्या तरी चांगल्या कंपनीला कंपनी सुरू करण्याची परवानगी द्यावी. परंतु कंपनी सुरू होऊदे, अशी भूमिका त्यावेळी ठेकेदार दीपक किर यांनी मांडली होती. तसेच कंपनी सुरू होण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने लढणार असून, यामध्ये काेणताही श्रेयवाद नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. मात्र राज्याचे उद्योगमंत्री बनल्यानंतर रत्नागिरीच्या हिताची जाणीव असलेले मंत्री उदय सामंत हेच भारती शिप यार्ड कंपनी सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास रत्नागिरीच्या जनतेला वाटतो आहे.
२०१४ सालापासून ही कंपनी एडेलविस मालमत्ता पुनर्रचनाच्या नियंत्रणाखाली आहे. कंपनीच्या मालमत्तेच्या पुनर्गठनासाठी १२०० करोड देण्याचे ठरले होते, पण प्रत्यक्ष मात्र ३० कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरीतून १० जहाजांची निर्मिती करण्यात आली होती. या कंपनीला वॉरशिप बांधायची परवानगी आहे व ही कंपनी देशासाठी उत्कृष्ट जहाजही बनवू शकेल. सध्याच्या घडीला कंपनी सुरू करण्यासाठी काहीशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता उद्योगमंत्री उदय सामंत या कंपनीला सुरू करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ही कंपनी पुन्हा सुरू व्हावी यासाठी कामगार आणि जनतेने अनेक वेळा आंदोलने केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही कंपनी सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली. मात्र सततचा पाठपुरावा करूनही कंपनी सुरू करण्यात यश आले नाही. आता पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कंपनी सुरू करण्याचा विषय मिऱ्या वासिय आणि रत्नागिरीकरानी मांडली आहे. त्यामुळे तितक्याच तळमळीने मंत्री सामंत यांनी हा बंद प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी तळमळीने प्रयत्न सुरू केले आहेत.
…तर मंत्री सामंत यांचा मोठा विजय ठरेल
गेल्या दशकापेक्षा अधिक काळापासून बंद असलेला भारती शिपयार्ड प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. कर्मचारी आणि ग्रामस्थानी सातत्याने शासन दरबारी, लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र तरीही स्थिती जैसे थे आहे. आता ही बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना यश आले तर तो त्यांचा या प्रकल्पाबाबत मोठा विजय मानला जाणार आहे.