रत्नागिरी शहरातून आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळेकडे जाताना साखरतर पूल पार केला की एक अतिशय सुंदर ठिकाण लागतं. ते म्हणजे काळबादेवी. खरं म्हणजे या गावाचे नाव पुसाळे होते परंतु कालंबिका देवीचे म्हणजेच काळबादेवीचे मंदिर इथं असल्याने गावाला काळबादेवी असं नाव पडलं. शंकराच्या या मंदिरासाठी अतिशय सुंदर ठिकाण निवडण्यात आले आहे. असं म्हंटलं जातं की काळंबादेवी ही देवी गोव्याहून इथं आली. रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदीचे संरक्षण आहे.
या देवळात एक पोर्तुगीज घंटा आहे. स्थानिकांच्या मते या घंटेचे वजन ५०० किलो आहे आणि तिचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू जातो. या घंटेवर क्रूस आणि १७३७ साल कोरलेले दिसते. सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेल्यांच्या मार्फत ही पोर्तुगीज घंटा उंटावरून इथं पाठवली अशी नोंद इतिहासकारांना सापडली. अशा पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात ५० ठिकाणी तरी असतील.
अगदी साधी पण प्रमाणबद्ध बांधणी आणि निळ्या रंगाने रंगवलेलं हे मंदिर सागराच्या निळाईशी नातं सांगतं. दगडी दीपमाळा आकाशाच्या निळेपणाशी एकरूप होताना दिसतात.