रत्नागिरी : फ्रेमएलमेंट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झी टाॅकीज प्रस्तुत आणि रत्नागिरीतील तंत्रज्ञ, कलाकारांची छाप असलेला एक उत्तम चित्रपट “पुनःश्च हरी ओम” रसिकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 11 जुलै 2021 रोजी दुपारी 12 आणि सायंकाळी ६ वाजता झी-टाॅकीज वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट रत्नागिरीतील ‘निखिल पाडावे’ आणि ‘प्रथमेश भाटकर’ या दोन रत्नांनी सजविला आहे. निखिल पाडावे यांनी त्यांच्या एडिटींगचा तसेच प्रथमेश भाटकर यांनी त्यांच्या अभिनयाचा उत्तम दर्जा यात दाखविला आहे.
या चित्रपटात स्पृहा जोशी, विठ्ठल काळे, निता शेंडे, वंदना वाकनिस-सरदेसाई, संजय कुलकर्णी, प्रथमेश भाटकर, देवेंद्र गायकवाड हे अतिशय मेहनती आणि दिग्गज कलाकार आहेत.
कोरोना काळामुळे वाताहत होताना नव्याने सुरुवात करणाऱ्या कुटुंबाचे कौटुंबिक हृदयस्पर्शी कथानक या चित्रपटाचे आहे. “पुनःश्च हरी ओम” हा चित्रपट फ्रेमएलमेंट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झी टाॅकीज प्रस्तुत असून 11 जुलै रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता तो रसिकांना झी-टाॅकीज वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती रोहित म्हात्रे, सचिन यादव,बवेश जानवलकर यांनी केली आहे. मिताली जोशी लिखीत, विविध कोरगावकर दिग्दर्शित, गायक – अनुराग गोडबोले, शब्द- मनीष अनसूरकर, संगीत- अनुराग, चिन्मय यांचे आहे. हा चित्रपट अतिशय काळजीपूर्वक आणि मेहनतीने एक आगळी वेगळी कलाकृती म्हणून रसिकांच्या भेटीला आणला आहे. तसचं या चित्रपटातील गाणेही यु ट्यूब वरती प्रदर्शित झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अत्यंत कठीण काळ यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. परंतु अशा प्रसंगात जेव्हा जवळचे साथ देत नाहीत, तेव्हा आपले कलाकार मित्र याच कठीण काळात कष्ट करून आपल्याला आनंदी ठेवण्याचा आणि आपल्या चेहऱ्यावर छोटसं हसू आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकण हे अशाच विविध कलाकारांनी सजलेले एक सुंदर विश्व आहे. या कोकणातील- रत्नागिरीमधील दोन रत्ने असलेल्या निखिल पाडावे यांनी त्यांच्या एडिटिंग व प्रथमेश भाटकर यांनी त्यांच्या अभिनयाची उत्तम छाप या चित्रपटात उमटविली आहे. या कलाकृतीमुळे रत्नागिरीकरांना त्यांचा विशेष अभिमान वाटणार आहे. हे दोन्ही कलाकार रत्नागिरीचे असून अतिशय मेहनती आणि अभ्यासू आहेत. आणि त्यांच्या याच मेहनतीचे चिज होत आहे. तर सर्वांनी हा चित्रपट पहायला विसरू नका, गोष्ट तुम्ही आम्ही प्रत्येकाने अनुभवलेली “पुनःश्च हरी ओम”.!