(रत्नागिरी)
रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील विविध विकास कामांची ई निविदा सूचना क्र. 09, सूचना क्र. 06, सूचना क्र. 08 दिनांक 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत विविध प्रकारच्या योजना अंतर्भूत आहेत. त्या कामांपैकी काही कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी चांगल्या स्थितीत गटार असताना सुध्दा ते तोडून नवीन गटार बांधले आहे. अशा कामाना नगरपरिषद जबाबदार आहे. ही सर्व कामे थांबवून त्याची चौकशी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत केला.
दोन वर्षांपासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी, पगार रोखीकरण आणि इतर भत्ते असे अडीच कोटी रूपये नगर परिषद देणे आहे. कामगार मक्तेदारांचे दर महिना 35 लाख रूपये असे 7 महिन्याचे पैसे दिलेले नाहीत एवढी दयनीय अवस्था नगरपरिषदेची झाली असून त्याला जबाबदार मुख्याधिकारी असल्याचा आरोपही मिलिंद कीर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी नगर परिषदेची सुधारित नळपाणी योजना सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून घेतली आहे. त्या योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यासाठी नगरपरिषदेने आर्थिक भाग भरण्याची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. त्यामुळे यापूर्वीच नगरपरिषद आर्थिक संकटात असताना मुख्याधिकारी यांनी हाती घेतलेली विकासकामे नगरपरिषदेला आर्थिक अडचणीत आणत आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनासाठी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते. त्यावेळी नगर परिषदेला उर्वरित निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक रूपयाही आला नसल्याचा आरोप मिलिंद कीर यांनी केला आहे. 100 कोटी रूपये निधीच्या रस्त्यांच्या घोषणेमध्ये रत्नागिरी नगर परिषदेने भाग भांडवलासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. नगरपरिषदेच्या ठेकेदारांची 35 कोटी रूपयांची देणी आहेत. आज नगर परिषदेचे क्रेडीट रेटिंग झालेले नाही त्यामुळे कोणीही नगर परिषदेला कर्ज देणार नाही अशी अवस्था असल्याचे मिलिंद कीर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.
तारांगणासाठी माळनाका येथील दहा टक्के जागेचा वापर करायचा होता. मात्र तारांगणासाठी संपूर्ण जागा वापरली आहे. त्यामुळे उर्वरित बांधकाम हे अवैध असून त्याच कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करणार आहेत असा टोला मिलिंद कीर यांनी हाणला.