(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात संतापजनक प्रकार घडला आहे. पऱ्याच्या आळी येथील एका तरुणाने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरुन आंबेडकरी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या. या प्रकरणाबाबत पोलिसांनी तातडीने संबधित तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सुजित सुरेश खडपे (राहणार पऱ्याची आळी, D विंग, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.
संशयित सुजित खडपे हा तरुण राहत असलेल्या पऱ्याची आळी येथील अपार्टमेंट वृंदावन पॅलेसच्या जिन्यावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करत अतिशय घाणेरड्या शब्दात मोठमोठ्या आवाजाने बोलत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसत आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी (दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास घडला. या प्रकाराचे सर्व चित्रीकरण बाजूलाच राहत असलेल्या एका महिलेने केले. यानंतर अपशब्द बोलणाऱ्या सुजित खडपेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊन भीम आर्मी, भीम युवा पँथर या सामाजिक संघटनेच्या ग्रूपवर आला. व्हिडिओ पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. आक्रमक झालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. घडलेल्या प्रकाराबाबत शुक्रवारी (दिनांक ५ जानेवारी २०२४) सकाळीच भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, तालुकाध्यक्ष विशाल सावंत, चंद्रकांत जाधव, संदीप पवार, नंदकुमार सावंत, आशिष कांबळे या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. व्हिडिओतील तरुणाला तातडीने अटक करण्यास सांगितले. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल, असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. शहर पोलिस निरीक्षकांनी तत्काळ दोन गाड्या व्हिडिओतील तरुणाला शोधण्यास पाठवल्या.
पोलीसांनी तत्काळ संशयित सुजित खडपेला शोधून काढत पोलीस ठाण्यात हजर केले. त्याच्याविरोधात पोलिसांनी भा.दं. सं. १९६० नुसार कलम २९५, ५०४ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणी संशयित सुजित खडपे याला पोलिसांनी आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजुर केला आहे.
आंबेडकरी संघटना एकवटल्या
आक्रमक झालेले कार्यकर्ते खडपेला प्रसाद देण्यासाठी तो राहत असलेल्या पऱ्याच्या आळीतील घरी दाखल झाले. मात्र कार्यकर्त्यांच्या तावडीत तो सापडला नाही. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठत प्रीतम आयरे यांनी रीतसर तक्रार दाखल केली. यावेळी भीम युवा पँथर, भीम आर्मी, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती या संघटनांचे कार्यकर्ते संशयित खडपे याला अटक होऊन न्यायालयात हजर करेपर्यंत ठाण मांडून बसले होते.
रत्नागिरीचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न
दरम्यान या प्रकरणाबाबत आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. देशातील नागरीकांना स्वतंत्र, समता, बंधुता बहाल करणारे भारताचे संविधान ज्या महामानवाने दिले. त्या डॉ बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या प्रवृतींना आता पोलीस प्रशासनाने ठेचून काढले पाहिजे. अशा नगण्य घटनांमुळे रत्नागिरीतील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. इथून पुढे अशा घटना घडल्यास भीम युवा पँथर संघटनेकडून प्रखर दखल घेतली जाईल. अशी संतप्त प्रतिक्रिया मा. अध्यक्ष प्रीतम आयरे यांनी दिली आहे.