(रत्नागिरी)
अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे मोह असतात, परंतु याच मोहाला संकल्पनेची जोड दिली तर काहीही अशक्य नाही. अशीच भन्नाट संकल्पना रत्नागिरी पावस येथील कुर्णे गावातील एका तरुणाने केली आहे, आणि त्यांच्या या छंदाची नोंद वर्ल्ड ऑफ गिनीज बूकात झाली आहे. आदित्य भट असे या मुलाचे नाव आहे. त्याने एका मिनिटात 163 फोटो काढले आहेत. एवढच नव्हे तर त्याने सूर्य अस्ताला जाताना वेगवेगळ्या रूपात आपल्या फोटोमध्ये छायाबद्ध केलं आहे.
आदित्य भट त्याच्या वेगवेगळया कल्पनेतून फोटो काढत असतो. कधी त्याच्या फोटोत माशीने सूर्याला धरलेले पाहायला मिळते, तर कधी मुंगी पाणी पिताना दिसते यातून माणसाची प्रतिमा काय धमाल करु शकते ते आदित्य भटचे फोटो पाहिल्यानंतरच लक्षात येते.
गेले काही दिवस सोशल मीडियावर सूर्याचे काही फोटो व्हायरल झाले होते, एक मुलगा चक्क वजनकाट्यावरच सू्याचं वजन करत आहे, आणि वजन करून झाल्यावर तो सूर्य दुसऱ्या मुलाला पिशवीत भरुन देत आहे आणि त्यावर कहर म्हणजे दुसऱ्या मुलाने तो दिलेला सूर्य पिशवीत भरुन घेऊन निघूनही जात आहे. सूर्य विकण्याचा हा जो क्रम आहे तो छायाचित्रकार आदित्य भट याने अफलातून टिपला आहे. मोबाईलद्वारे हे सगळे फोटो त्याने काढले आहेत. आपली कल्पना वापरून एक नव्हे तर आदित्यने असे अनेक फोटो काढले आहेत. पाणी पित असलेली मुंगी, सायकलवरुन सूर्याला घेऊन निघालेली मुलं, आंब्याला धरणारी ओंबाला, मानवी डोळ्यातील बुबूळातील टिपलेले क्षण असे एक ना अनेक संकल्पनेतून त्याने फोटो काढले आहेत.
त्याच्या या छंदामुळेच त्याने काही दिवसांपूर्वी मोबाईलवर त्याने एका मिनिटात 163 फोटो काढले, त्याच्या या वेगळ्या करामतीची दखल “वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”ने घेऊन त्याच्या फोटोग्राफीची नोंद विश्वविक्रम म्हणून केली आहे. त्याच्या या विश्वविक्रमामुळे आता तो आणि त्याची फोटोग्राफी आणखी चर्चेचा विषय ठरली आहे.
आदित्य भट हा रत्नागिरीतील पावसमधील कुर्धे गावातील आहे. छंदातून फोटोग्राफीची कला जोपासणाऱ्या आदित्यने त्याच्या प्रत्येक फोटोतून वेगळी संकल्पना मांडलेली पाहायला मिळते. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचे फोटो प्रचंड व्हायरल होत असतात. अनेक छायाचित्र स्पर्धेत त्याच्या छायाचित्राना पुरस्कार आणि पारितोषिकं मिळाली आहेत.
नाशिकच्या कॅमेरा छायाचित्र प्रदर्शनात आदित्यने मोबाइलद्वारे काढलेला फोटो झळकला
काही दिवसांपूर्वी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित डॉ विनय ठकार स्मृतिप्रित्यर्थ छायाचित्र प्रदर्शनात २०० पैकी पहिल्या २० निवडक फोटोंमध्ये आदित्यचा फोटो मांडण्यात आला होता. मोबाईलद्वारे काढलेला मुंगी पाणी पिताना फोटोची कॅनवास प्रिंट या प्रदर्शनामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या प्रदर्शनामध्ये कॅमेरा फोटो समाविष्ट केले होते. मात्र आदित्य याने काढलेल्या एकमेव मोबाईल फोटोचा प्रामुख्याने समावेश केला होता.
कोरोना काळात संपूर्ण भारतात लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद असताना त्या काळात आदित्य भटने आपला फोटोग्राफीचा छंद जोपासत त्यातील वेगळीच नजाकता साऱ्या जगाला दाखवून दिली आहे. साध्या मोबाईलवर फोटो काढून सोशल मीडियावर त्याने अपलोड केले की, त्याच्या या फोटोला ढिगानं लाईक आणि कमेंट मिळत असायचे. या लाईक कॉमेंटमुळे त्याला आणखी आवड निर्माण होत गेली. ही फोटोग्राफीची आवड चक्क आता विश्वविक्रम म्हणून आदित्यची नोंद झाली आहे.
आदित्य भटच्या फोटोग्राफीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतल्यानंतर त्याने आपल्या छंदाविषयी फेसबुकवर पोस्ट लिहित हा छंद त्याला कसा जडला हे त्याने सांगितले आहे. यासोबत त्याने प्रोत्साहित करणाऱ्या मित्र परिवारसह सर्वांचेच आभार मानले आहे. विश्वविक्रम करणाऱ्या आदित्य भटचे चौहोबाजूंनी कौतुक केले जात आहे.