(रत्नागिरी)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पुणे येथे सुरू असलेल्या १६ वर्षांखालील सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीतील (कै.) छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीतील सार्थक देसाई याने सलग दोन शतके झळकवली आहे.
पुणे येथील सुपर लिग स्पर्धेत सेक्रेटरी इलेव्हन या संघातून खेळताना स्पोर्टसमन पुणे संघाविरुद्ध १३३ चेंडूत १०७ धावा करून पहिले शतक केले. दुसऱ्या सामन्यांमध्ये वाय एम सी ए पुणे संघाविरुद्ध १२० धावा करून सलग दुसरे झंजावती शतक पूर्ण केले. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना फिरकी गोलंदाजीने सहा फलंदाज बाद केले. या स्पर्धेपूर्वी झालेल्या १६ वर्षाखालील निमंत्रित स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळताना सार्थक देसाई यांनी ८७ नाबाद धावा केल्या होत्या. शतकाच्या उंबरठ्यावर असताना रत्नागिरीचा डाव घोषित करण्यात आला. त्यामुळे शतकापासून वंचित रहावे लागले होते.
या यशाबद्दल ॲकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्र पाथरे यांनी सार्थक याला रोख रुपये पाच हजार पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच (कै.) छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमीतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्लेयर ऑफ द इअरचा किताब ॲकॅडमीच्या वर्धापनदिनी त्याला दिला जाणार आहे. त्याला त्याचे आई-वडील व सार्थकचे मामा यांची उत्तम साथ मिळत आहे. सार्थक देसाई याच्या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष बाळू साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई उपाध्यक्ष दीपक मोरे व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.