(रत्नागिरी/प्रतिनिधी)
सर्वसामान्यांच्या परिस्थीची जाणीव ठेवून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या रत्नागिरीतील तरुण डॉक्टरने सुवर्णपदकात ‘श्री विजय’ फडकवला आहे.
मेंदूसारखी गुंतागुंतीची असो अथवा शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाच्या शस्त्रक्रिया असो त्या अत्यंत कुशलतेने पार पाडून अनेकांना नवं आयुष्य देणारे तरुण न्यूरोसर्जन डॉ . श्रीविजय अनिरुद्ध फडके यांना नवी दिल्लीच्या ‘ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस ‘ ( NBEMS ) या संस्थेतर्फे घेतल्या गेलेल्या DrNB च्या अंतिम परीक्षेत फडके यांना न्यूरोसर्जरी या विषयात सुवर्णपदक मिळालं आहे. यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे .
जून २०१ ९ ते जून २०२१ या कालावधीत ही परीक्षा दिलेल्यांकरिता दीक्षान्त सोहळा २० जून २०२२ रोजी नवी दिल्लीतील डॉ . आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे. त्या वेळी डॉ . श्रीविजय यांच्यासह अन्य सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्यक्ष गौरवण्यात येणार आहे .
– कोलकात्यातील इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेतून डॉ . श्रीविजय फडके यांनी ही परीक्षा दिली होती . डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड हा तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट डॉक्टरल दर्जाचा शिक्षणक्रम असतो. यापूर्वी डॉ . श्रीविजय यांनी २०१८ मध्ये न्यूरोसर्जरी या विषयात कोलकाता विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवले होते. त्यांचे वय सद्या ३४ वर्षे आहे. आतापर्यंत त्यांनी एमबीबीएस , एमएस , एमसीएच ( न्यूरोसर्जरी ) आणि डीएनबी ( न्यूरोसर्जरी ) या पदव्या प्राप्त केल्या आहेत . वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजिकल सोसायटीजची ( WFNS ) अत्यंत प्रतिष्ठेची अशी फेलोशिपही त्यांना मिळाली होती .
डॉ . श्रीविजय यांचे वडील डॉ . अनिरुद्ध हे दापोलीतील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आहेत. डॉ . श्रीविजय यांचे शालेय शिक्षण दापोलीतील ए. जी . हायस्कूलमध्ये झाले. सोलापूरच्या डॉ . व्ही . एम . गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS चे शिक्षण घेतले . त्यानंतर कोलकात्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी नागपूरच्या येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये रेसिडेंट सर्जन म्हणून सेवा दिली .
कोलकात्यात SSKM हॉस्पिटलमध्ये निवासी न्यूरोसर्जन म्हणून त्यांनी तीन वर्षांत मेंदूवरच्या सुमारे ५०० शस्त्रक्रिया केल्या होत्या .
सद्या रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून ते काम पाहतात. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारांसाठी रत्नागिरीत येतात ; मात्र सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोल्हापूर किंवा मुंबई पुण्याला पाठवावे लागत असे. मात्र डॉ . श्रीविजय फडके रत्नागिरीत आल्यामुळे इथेच उपचार मिळणे शक्य झाले आहे. रत्नागिरी सिव्हील मध्ये ते रुजू झाल्यानंतर एका महिन्यातच मणका आणि मेंदूवरच्या सुमारे ११ महत्त्वाच्या आणि मोठ्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. न्यूरोसर्जरीसाठी आवश्यक असणारी सामग्री रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यांनी ती स्वखर्चाने आणली एवढी मोठी समाजसेवाही त्यांनी रुग्णांसाठी केली आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासह चिरायू हॉस्पिटलमध्येही डॉ . श्रीविजय फडके सेवा देतात. तसेच , रत्नागिरी शहरात आरोग्य मंदिर येथे श्रीयश कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्रेन अँड स्पाइन क्लिनिक हा त्यांचा स्वतःचा दवाखानाही आहे