(संगमेश्वर / विशेष प्रतिनिधी)
मुंबई – गोवा महामार्गावरील गेले अनेक वर्ष रखडलेले पुलांचे काम काही केल्या मार्गी लागत नाही. संगमेश्वरमधील शास्त्री, सोनवी, कोळंबे, बावनदी पुलाची कामे अद्यापही रखडलेली आहेत. मात्र गेले कित्येक वर्ष रडत खडत चालू असलेले सप्तलींगी पुलाचे काम अखेर या महिन्यात पूर्ण झाले आहे. मध्यंतरीच्या काळात ठेकेदार दोन पिलर उभारून गायब झाला होता. त्यानंतर बराच काळ हे काम रखडले होते. 2021 मध्ये या कामाने गती घेतली आणि आता सप्तलिंगी पुलाचे मार्गी लागले.
सप्तलिंगी पुलाचे काम मार्गी लागले असले तरी महत्वाचे शास्त्री, सोनवी, कोळंबे, बावनदी पुलांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोळंबे पुलाचे काम सध्या चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु पूर्णत्वास केव्हा जाईल हे त्या ठेकेदाराला सुद्धा माहीत नसेल. कारण काम पूर्णत्वास नेईपर्यंत तो राहणार आहे की नाही याची त्यालाच शास्वती देता येत नाही.
बावनदी पुलाचे काम म्हणजे नुसता बागुलबुवा अशी स्थिती झाली आहे. सुरुवातील मशिनरी, स्टील, जेसीबीच्या सहाय्याने रात्रंदिवस होत असलेले पिलरचे काम पाहिल्यावर वाटत होते लवकरच बावनदी पुलाचे काम मार्गी लागेल आणि जुन्या पुलावरून जीव मुठीत घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांची यातून लवकर सुटका होईल. मात्र असे वाटत असतानाच, सारी यंत्रणा दिसेनासी झाली. शेवटी तेही काम रखडले.
दरम्यानच्या काळात निवळी येथील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला होता. एकेरी वाहतूक करण्यात आली. चर खोदण्यात आले. मातीचा ढिगारा करून ठेवण्यात आला होता. पावसाळ्यातही काम सुरू होते आणि हा उड्डाण पुल उड्डाण घेणार असे वाटत असताना ठेकेदार गायब झाला. हे सर्व ठेकेदार काम अर्धवट सोडून पळतात की पळवून लावले जातात हेच कळत नाही.
पनवेल ते झाराप दरम्यान २३० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण झालेले आहे. मात्र आरवली ते वाकड हा ९१ किलोमीटरचा टप्पा डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले होते. 2022 अर्धा झाला तरी निवळी घाटातील डोंगर कटाईचे काम चालू आहे. कसली आश्वासन आणि कसल काय ? 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत काम आटपायला लावून निकृष्ट दर्जाचे कामच जनतेच्या आणि वाहन चालकांच्या पदरी पडणार अस वाटतय. मग घाई गडबडीत रत्नागिरीतील रस्त्यांना जशी लेव्हल नाही तशी महामार्गाची होऊ नये म्हणजे झालं.