(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील ग्रामपंचायतीच्या शिवगण आडनावाच्या ग्रामसेविका सतत गैरहजर असल्याने ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक : गटविकास अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून होतेय् कारवाईची टाळाटाळ !
अशा आशयाची बातमी रत्नागिरी 24 न्यूज ने बुधवारी प्रसिद्ध केली होती. याबाबत खुलासा करताना भगवतीनगरच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शिवगण यांनी तात्काळ रत्नागिरी 24 न्यूज चे गणपतीपुळे प्रतिनिधी वैभव पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती देताना सांगितले की, भगवतीनगर येथील काही ग्रामस्थांनी माझ्या बाबतीत चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. मी गरोदर असल्याने सध्या रजेवर आहे. तशा प्रकारचा रजेचा अर्ज रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आपण भगवतीनगर ग्रामपंचायतीमध्ये येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण भगवतीनगर ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे काम अतिशय चोखपणे केले आहे. तरीदेखील काही लोक माझ्या बाबतीत चुकीचा गैरसमज पसरवीत असून डिजिटल मिडिया आणि वृत्तपत्रामध्ये खोटया बातम्या देत आहेत. परंतु या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून चुकीच्या आहेत. संबंधित ग्रामस्थांनी विनाकारण असे चुकीचे आरोप करणे थांबवावेत, असे आवाहन त्यांनी रत्नागिरी 24 न्यूज जवळ बोलताना व्यक्त केले.