(नवी दिल्ली)
अनेकवेळा अपघात किंवा इतर उपचार घेत असताना आपल्या रक्ताची गरज भासते आणि रक्तपेढी त्या बदल्यात जास्त पैसे घेतात. मात्र आता रक्तपेढीतून रक्त घेताना जास्त पैसे देण्याची गरज नाही. सरकारनं रक्तपेढ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. सरकारकडे गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढ्यांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) रक्त युनिटवरील सर्व शुल्क काढून टाकले आहे. त्यामुळे आता रक्तपेढ्यांना फक्त पुरवठा आणि प्रक्रिया शुल्कच आकारता येणार आहे. याबाबत डीसीजीआयने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे.
डीसीजीआयने आपल्या पत्रात गेल्या महिन्यात पार पडले्लया औषध सल्लागार समितीच्या बैठकीचा उल्लेख करताना म्हटले की, रक्तासाठी जास्त पैसे आकारण्यासंदर्भात एटीआर पॉइंट 3 च्या अजेंडा क्रमांक 18 च्या संदर्भात शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले की, रक्त विकण्यासाठी नाही, ते फक्त इतरांना देण्यासाठी आहे. त्यामुळे रक्तपेढ्या यापुढे फक्त प्रक्रिया शुल्क आकारू शकतात.
रक्तासाठी किती शुल्क निश्चित?
जेव्हा एखादी व्यक्ती रक्तदान करते, तेव्हा ते रक्त थेट रुग्णाला दिले जात नाही. पहिल्यांदा ते सुधारित केले जाते. रक्तामध्ये लाल पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा असतात. त्यामुळे रक्त संक्रमण करून रक्त बनवण्यासाठी खर्च करावा लागतो. या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 मध्ये एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. ज्यामध्ये खाजगी रक्तपेढ्या संपूर्ण रक्त प्रक्रियेसाठी 1550 रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ शकत नाहीत, असे म्हटले होते. पॅक केलेल्या लाल पेशी, फ्रोझन प्लाझ्मा आणि प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटसाठी प्रक्रिया शुल्क देखील खाजगी रक्तपेढ्यांसाठी निश्चित करण्यात आले होते. रक्तपेढ्या पॅक केलेल्या लाल पेशींसाठी 1550 रुपये प्रक्रिया शुल्क, ताज्या गोठवलेल्या प्लाझ्मासाठी 400 रुपये प्रक्रिया शुल्क आणि प्लेटलेट्स एकाग्रतेसाठी 400 रुपये प्रक्रिया शुल्क आकारू शकतात, तर सरकारी रक्तपेढीमध्ये प्रक्रिया शुल्क 1100 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
रक्त विकण्यासाठी नाही : DCGI
26 सप्टेंबर रोजी झालेल्या औषध सल्लागार समितीच्या 62 व्या बैठकीचा संदर्भ देत डीसीजीआयनं 26 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात ‘रक्तासाठी अधिक शुल्क आकारण्याबाबत एटीआर पॉइंट तीनच्या अजेंडा क्रमांक 18 संदर्भात शिफारस केली आहे.’, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. रक्त विकण्यासाठी नाही, ते फक्त पुरवठ्यासाठी आहे, त्यामुळे रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात. DGCI नं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व रक्तपेढ्यांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचे निर्देश देण्यास सांगितलं आहे.