येत्या २ ते ३ दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पञकार परिषदेत दिली आहे. सध्या रस्त्यांवर पडलेले खड्डे हे प्राधान्याने बुजविण्यात येणार असून त्यामुळे गणपतीत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
२६ आणि २७ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुंबई-गोवा महामार्गावरील पडलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा व पाहणी दौरा आयोजित केला आहे. काल सकाळी पनवेल येथून दौऱ्याला सुरूवात झाली. त्यानंतर कासू जि. रायगड, नागोठणे, वाकड फाटा, खांब, जि. रायगड वरसगाव फाटा, जि.रायगड, इंदापूर, कशेडी घाट, परशुराम घाट येथील सतत कोसळणाऱ्या दरडींच्या उपाययोजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
परशुराम घाटात पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळत असल्याने या ठिकाणची वाहतूक अनेकदा बंद ठेवावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुंबई-गोवा महामार्गाबाबत पाठपुरावा करत निधी मंजूर करून घेत हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल गडकरी यांचेही त्यांनी आभार मानले. या महामार्गात काही ठिकाणी जमिनीच्या भूसंपादनाच्याही अडचणी असून हा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.