(संगमेश्वर)
विलास रहाटे यांचा रांगोळी हा आवडता विषय असला तरी रांगोळीसोबतच मूर्तीकला, चित्रकला, लाकडामधील कोरीवकाम, थर्माकॉलमध्ये नावाचे काम, 3D कॅलिग्राफी कला विलास यांना अवगत आहेत. नवीन वर्षात अनेक कलाकार अनेक उपक्रम साकारतात. देवरूख येथील युवा रांगोळीकार विलास रहाटे यांनी असाच एक उपक्रम साकारला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे त्यांनी कॅन्व्हासवर साकारली आहेत. मूळचे चिपळूण येथील आणि सध्या देवरूख येथे स्थायिक असलेले युवा चित्रकार विलास रहाटे यांनी नववर्षानिमित्त वेगळा संकल्प योजून तो पूर्णत्वास नेला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारली आहे. यात गणपतीपुळे येथील गणेशमंदिर, मार्लेश्वर मंदिर, थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक जन्मस्थान, कर्णेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, रत्नादुर्ग, मारूती मंदिर, उक्षी बोगदा, मांडवी समुद्रकिनारा, कशेळी समुद्रकिनारा ही चित्रे रहाटे यांनी साकारली आहेत. कॅन्व्हासवर अॅक्रॅलिक रंगात ए ३ या आकारात ही सर्व चित्रे रहाटे यांनी साकारली आहेत. त्यांनी साकारलेली ही सर्व चित्रे एका कॅलेंडरवर विराजमान झाली आहेत.
विविध स्तरावर गौरव
युवा रांगोळीकार म्हणून ओळख असणाऱ्या विलास रहाटे यांनी दोन वर्ष नॅशनल लेव्हलमध्ये रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन गोल्ड मेडल मिळवले आहे. यामध्ये रांची,झारखंड (२०१८ ) आणि चंदीगड पंजाब (२०१९) तसेच राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुका स्तरावर १७० पेक्षा जास्त वेळा क्रमांक पटकावला आहे. यासोबत युवा चित्रकार रहाटे याला रांगोळी कलेतील विशेष प्राविण्यबाबत मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्र युवा कला गौरव (२०२१) हा अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. विलास यांना कार्यशाळेबरोबरच रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, सातारा, कराड येथील महाविद्यालयात विद्यापीठातील स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून बोलवले जाते.
गिनीज बुकात नोंद
रहाटे यांनी जगातील सर्वात लहान ३ सेमी × ३ सेमी आकारात छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली होती. युवा चित्रकार रहाटे याची वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही २०२१ मध्ये नोंद झाली आहे.
रांगोळी कला ही स्वतःच सातत्याने सरावाने शिकलो. मात्र आता मी रांगोळी कलेचा वापर आवड तसेच व्यवसाय म्हणून करीत आहे. मला रांगोळीसाठी जिल्हा व राज्यबाहेरून मागणी असते. या कलेतून माझी ओळख निर्माण झाली त्यामुळे आवड आणि काम हे एकच असल्यामुळे कामातील प्रत्येक क्षण आनंदाने जगतो.
– विलास रहाटे (युवा रांगोळीकार)