(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील युवा उद्योजक गौरांग आगाशे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री. आगाशे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांची शिकवण कशी आचरणात आणावी याबद्दल सांगितले. आजच्या युवापिढीला वक्तशीरपणा, चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहेत. श्री.आगाशे यांनी स्वत: च्याअनुभवातून युवा उद्योजकांमध्ये संप्रेषण कौशल्य, संयम, स्टेज डेअरिंग, नम्रता हे गुण असणे आवश्यक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईशा कीर हिने केले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल या कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम -अमिषा प्रकाश मडके, द्वितीय- ईशा अनिल कीर ,तृतीय- सोनिया ब्रिजेशकुमार शुक्ला ( सर्व प्रथम वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये आव्हान आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर एनएसएस स्वयंसेवक मृदुला सनगरे हिने स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती सांगितली आणि रितेश भायजे याने राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील , उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिषा मडके हिने केले. प्रज्ज्वल कळंबटे याने आभार मानले.