(मुंबई / किशोर गावडे)
युवा सेना विक्रोळी विधानसभेच्या वतीने झिम्मा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन सुनीलभाऊ राऊत आणि युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर रोजी पंजीवाडी हॉल कांजूरमार्ग (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल २० महिला मंगळागौर पथकांचा या स्पर्धेत समावेश होता. या झिम्मा महोत्सवात “मंगळागौर” स्पर्धेला फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच सदर स्पर्धेत “आकर्षक स्त्री व्यक्तिमत्व” या एकूण सहा वैयक्तिक पुरस्काराने सर्व भगिनी फार आनंदी झाल्या,
सदर स्पर्धेत भगिनी मोठ्या इर्षने व उत्साहाने पारंपरिक वेष परिधान करून सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत “आकर्षक स्त्री व्यक्तिमत्व” हा वैयक्तिक पुरस्कार कोमल दुदूसकर, अनिता देशमुख, प्रियंका मोरे, सीमा जोशी, श्रद्धा सावंत, सुप्रिया देशमुख यांनी पटकावला. या विजेत्यांना आकर्षक डायमंडचे कानातले पारितोषिक म्हणून देण्यात आले.
सदर “मंगळागौर स्पर्धेत”प्रथम क्रमांक बर्गे कॉटन ग्रुप कांजूरमार्ग, द्वितीय क्रमांक श्री स्वामी समर्थ ग्रुप विक्रोळी तृतीय क्रमांक आम्ही सरस्वतीच्या लेकी भांडुप गावं यांनी पटकावला. सदर स्पर्धेत सर्वच मंगळागौर पथकांनी आपली कला उत्तमरीत्या सादर केली व आपली संस्कृती जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघास आकर्षक सन्मान चिन्ह व प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित भाग घेतलेल्या मंगळागौर संघांमधील महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित केले गेले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला आमदार सुनील राऊत, शिवसेना उपनेते दत्ता दळवी, कामगार नेते संदीप आप्पा राऊत, महिला विभाग संघटीका राजराजेश्वरी रेडकर, समाजसेविका पल्लवी संजय पाटील युवा सेनेच्या कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील, उपविभाग संघटीका सिद्धी जाधव, रश्मी पहुडकर उपस्थित होत्या.
सदर स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शाहीर चित्रपट फेम केदार शिंदे यांची कन्या अभिनेत्री सना केदार शिंदे उपस्थित राहिल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रजनी भोईर व
सुषमा सुमंत यांनी धुरा सांभाळली. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा विधानसभा समन्वयक विनीत लाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या सर्व युवा – युवतींनी विशेष परिश्रम घेतले.