योगातून मानसिक संतुलन (भाग – ३)
युवा म्हटला की सळसळते रक्त! ओसंडून वाहणारा उत्साह, कुठेही धडक देणारी लाट जणू! अशी युवाची प्रतिमा डोळ्यासमोर असताना एखाद्या क्षुल्लक कारणावरून स्वतःस संपवणारा तरुण किंवा तरुणी पाहिली की हृदयात धस्स होते. २०-२५ वर्षे आईबाबांनी फुलाप्रमाणे जपलेल्या मुलीने असा निर्णय का घ्यावा? तिला वाढवण्यासाठी आईने किती कष्ट उपसले होते बरे? बाबांनी तर आपल्या मुलासाठी कित्येक घरांचे, संस्थांचे उंबरठे झिजवले होते. अशा अचानक घटनेने सगळे मातीमोल होते.
अशी काय उलथापालथ होते त्या मनात! की इतका सुंदर देह मृत्यूच्या ताब्यात देऊन ही तरुण मंडळी मोकळी होतात. जराही इतरांचा विचार करीत नाहीत. आपण गेल्यावर आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना काय वाटेल? स्वतःस संपवण्याची ही भावना इतकी का प्रबळ होते? त्या वेळी कुणीच कसे नसते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनेकांनी अनेक प्रकारे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ४० सेकंदाला एक आत्महत्या हा दर आजही कायम आहे.
आत्महत्येचा प्रकार कोणताही असूदे पण जातो मात्र एक महत्वाचा जीव. हे सर्व टाळायला हवे. काहीतरी करायला हवे. का करतात आत्महत्या? काही कारणे खालील प्रमाणे आपल्या कानावर किंवा वाचनात येतात.
१) विशिष्ट गोष्टीच्या दबावामुळे वाढता तणाव, २) कौटुंबिक परिस्थिती ३) प्रेमभंग ४) विश्वास घात ५) आर्थिक समस्या ६) अपयश ७) अहंकार दुखावणे ८) आपले कुणी नाही असे वाटणे. ९) स्वतःची तुलना इतरांशी करणे १०) आणि सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाची आभासी दुनिया. अशी अनेक कारणे तरुणाईचा जीव घेतात. काहीही असो, त्यांना आलेल्या प्रसंगाशी दोन हात करणे त्यांना जमले नाही हेच खरे!
काही विचारवंतांच्या मते विद्यार्थी दशेत असताना होणारी विचारांची बांधणी ह्या गोष्टीस अधिक कारणीभूत ठरते. महाविद्यालयातील प्रवेश हा अनेक विद्यार्थ्याचा वैचारिक संघर्षाचा काळ असतो. लहानपणापासून आईवडिलांनी केलेले संस्कार, ज्या समाजात तो वाढला त्या समाजातील रीतिरिवाजाचे संस्कार घेऊन तो आलेला असतो. अशा परिस्थितीत कॉलेज मधील मोकळे वातावरण, त्यात त्याची इतरांशी adjust करण्याची क्षमता यावर त्याच्या मनातील आत्मविश्वास वाढणे किंवा खचणे अवलंबून असते. आपल्या मुलांना जगाच्या पद्धतीने पुढे न्यायचे असेल तर त्या पद्धतीची तयारी पालकांनी त्याच्या लहानपणापासूनच करायला हवी. अन्यथा ती पुढे गोंधळतात. जी गोष्ट अजूनपर्यंत पहिलीच नाही, ऐकलीच नाही अशा गोष्टी अचानक जर समोर उपस्थित झाल्या तर मनाचा गोंधळ होणारच. शेवटी मुल त्याला येणाऱ्या अनुभवावरच आपले वैचारिक विश्व उभे करीत असते. असे विचार काळजीपूर्वकच त्याच्यापर्यंत पोहचायला हवेत. परंतु आजच्या वेगवान जगात अशा हळव्या मनाच्या किंवा अन्य कारणाने चटकन adjust न होणाऱ्या मूला मुलींची कोंडी होते. त्यांना थोडा वेळ हवा असतो. कुणाशी तरी ती संवाद करू इच्छितात. पण दुर्दैवाने त्यांच्यासाठी कुणालाच वेळ नसतो. अशा कठीण काळात ती आधार शोधत असतात. तो त्यांच्या सुदैवाने मिळाला तर खूपच छान! अन्यथा फाशीच्या दोराचाच त्यांना शेवटचा आधार वाटतो.
मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असताना काही गोष्टींची पूर्व तयारी करावी लागते. यास इंग्रजीत conditioning म्हणतात. याचा अर्थ कोणतीतीही घटना अपेक्षेप्रमाणे घडावी असे वाटत असेल तर त्याप्रमाणे तयारी करावीच लागते. स्टोव्ह पेटवायचा असेल तर त्याचा बर्नल आधी तापवावा लागतो. प्रवासास निघायचे असेल तर आवश्यक त्या सामानाची ब्याग भरावी लागते. खेळाच्या आधी खेळाडूला आवश्यक तो ड्रेस कोडं घालून वॉर्मअप करावे लागते. असे कोणतेच काम नाही की ज्याची पूर्वतयारी करावी लागत नाही. पूर्वतयारीने खालील फायदे होतात
१) मनात गोंधळ होतं नाही.
२) कामाचा दर्जा सुधारतो.
३) एकाग्रता व निश्चिन्तता वाढते.
४) आत्मविश्वास वाढतो.
५) काम करण्यात उत्साह येतो.
६) अपघात होत नाही.
साध्या घटनांचा हा नियम आपल्या जीवनासही लागू होतो. जसजसे मुलांचे वय पुढे सरकते तसतसी त्यांच्या पुढील जीवनाची पूर्व तयारी करून द्यायला नको काय? ती त्याने स्वतः करावी किंवा त्यास जमत नसेल तर पालकांनी आणि शिक्षकांनी मदत करावी. आज काय दिसते, पदवीचे शेवटचे वर्ष आले तरी पुढे काय करायचे याचा मुलांना पत्ता नसतो. “पुढे काय करायचे ठरवले आहेस?” या प्रश्नाचे ९०% मुलांना ठोस उत्तर देता येत नाही. हातात डिग्री पडली की मग शोधाशोध सुरु होते. ज्या वयात पुढील आयुष्याचा, करिअरचा विचार करायला हवा होता त्या वयात कॉलेजची मज्जा घेण्यात ती दंग राहतात. मग त्यात प्रेमप्रकरणे, पिकनिक, हॉटेलची मज्जा, आणि राजकारणातील मोर्चे, मित्रांमधील हेवे दावे इत्यादींचा समावेश होतो. त्याचा परिणाम चांगला होत नाही. कॉलेज संपल्यावर ह्या सर्व उठाठेवी संपतात. मग सुरू होतो वास्तव जीवनाचा विचार. त्यात उशीर होऊ लागला की हळूहळू नैराश्य आत शिरू लागते. जीथे सकारात्मक पूर्व तयारी व्हायला हवी होती तिथे आधीच सावध न झाल्याने नकारात्मक दृष्टी आकार घेऊ लागते. आणि निराशेच्या दिशेने पाऊले पडू लागतात. तसें न होण्यासाठी पूर्वतयारी करावीच लागते.
शालेय जीवनात मुलांचा शारीरिक विकास वेगाने होत असतो. त्यावेळी त्यांनी जास्तीत जास्त हालचाल करणे, बडबड करणे, भरपूर खाणे इत्यादी गोष्टी करणे अपेक्षित असते. परंतु महाविद्यालयाची पायरी चढली की त्यांचा अधिकाधिक वेळ वैचारिक बांधणीत जायला हवा. वाचन, लेखन, मनन, चिंतन ह्या गोष्टी व्हायला हव्यात. द योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ च्या गुरुमाँ हंसाजी म्हणतात, प्रत्येक मनुष्याची एक वैचारिक बैठक असायला हवी. ही बैठक जितकी सदृढ तेवढी ती व्यक्ती जीवनात येणाऱ्या संकटांना चांगल्या प्रकारे सामोरी जाऊ शकते. व स्वतःचा आत्मविकासही करू शकते.” परंतु युवावस्थेतील धोका हा की, या वयात मन बहिर्मुख होण्याची शक्यता अधिक असते. त्यात आजची मीडिया एवढी आकर्षक आहे की प्रयत्न करूनही मन अंतर्मुख होणे शक्य होत नाही. काही मुलांच्या घरातून चांगले संस्कार मिळालेले असतात. वाचन लेखन त्यांच्या संस्कारात असते. जीवनाचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळते. अर्थात ही त्यांची पूर्व तयारी त्यांची लहानपणीच झालेली असते. ही मुले पुढे स्वतःस सावरतात. मात्र अशी पूर्व तयारी सगळ्यांचीच होत नाही. अनेक मुले गरीब किंवा असंस्कृत घरातून आलेली असतात. अशा मुलांची वैचारिक बांधणी चांगली झालेली नसते. कॉलेज मध्ये आल्यावरच त्यांना जगाची व्यापकता समजते. अशावेळी त्यांचा मुल पिंड बलवान नसेल तर ही मुले या सर्वांचा सामना करू शकत नाहीत. अशा मुलांचे प्रमाण अधिक असते. बरीच मुले संस्कारहीन असतात. अशी मुले व्हायलंट होण्याची शक्यता अधिक असते. ही मुले स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान करतात. यूवावस्थेत पोहचल्यावर मुलामुलींनी खालील गोष्टींचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे असते
१) संगत चांगली असणे. मित्रपरिवार चांगला नसणे हे अत्यंत घातक आहे. सतत टीका करणारे, हिनवणारे, आत्मविश्वास खच्ची करणारे मित्र कधीच जोडू नयेत.
२) हे वय ज्ञानार्जनाचे आहे, आपल्या भावी आयुष्यातील जीवनाला कलाटणी देणारे आहे. याचे नेहमी भान असावे.
३) भौतिक सुखांना न भुलता अधिक वाचन लेखन मनन, चिंतन करून स्वतःची एक वैचारिक बैठक तयार करावी.
४) शारीरिक सुदृढतेसोबतच मानसिक ताकद वाढवणे आवश्यक असते.
५) मनाच्या ताकतीचे महत्व लक्षात घेऊन अध्यात्मिक साधनेची जोड याच वयात मिळाल्यास अति उत्तम.
६) नवीन प्रयोग करण्याचे हेच वय असते. आपल्यावर घरची जबाबदारी येण्याआधीच स्वतःच्या आवडीनुसार काही नवी वाट शोधता येते का ते पहावे. त्यासाठी कॉलेज कडून आयोजित होणाऱ्या सहली व शिबिरांत भाग घ्यावा. आईबाबांना काही काळ सोडून रहावे.
७) परंपरागत शिक्षण, व्यवसायाच्या जुन्या वाटा सोडून मनास व आंतरिक शक्तीस चालना देणारा नवीन विचार येतो आहे का याकडे लक्ष ठेवावे. तो विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी वाचन वाढवावे.
८) बाहेरील शिक्षण हे आपल्या आंतरिक शक्तिस जागे करणारे एक माध्यम आहे. त्यास सर्वस्व न मानता आपला स्वतःचा शोध घ्यायचा असतो हे समजल्यास खूपच चांगले. मोबाईलची दुनिया आभासी असते. त्यास सत्य मानू नये. प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा.
९) आपले कॉलेज, मित्र परिवार, व अन्य भौतिक बाबी हेच सर्वस्व नाहीत. ह्या सर्व गोष्टी काही काळासाठी आपल्या सोबत आहेत. जे पक्के ध्यानात ठेवून भविष्याची पूर्वतयारी करीत जावे.
एक गोष्ट फार महत्वाची असते ती ही की, बाह्य घटकांपेक्षा अंतरघटक आत्महत्येस अधिक कारणीभूत असतात. असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ. काच आणि दगड यांचा विचार करू. दगड काचेवर मारला की काच फूटते. यामध्ये तीन घटक आहेत. काच, दगड आणि मारणारा. यातील दगड मारणारा हा घटक बाजूला ठेऊ. दगडाने काच फोडली यात दोष कुणाचा? काचेचा की दगडाचा? बरेच जण यात दगडाला दोषी मानतात. परंतु योग काचेला दोषी ठरवते. आश्चर्य वाटले ना? बघा कठोरता हा दगडाचा गुण आहे. याउलट ठीसुळता हा काचेचा. एखाद्या भिंतीवर दगड मारल्यास भिंत फुटत नाही. कारण भिंत दगडाहून कठीण आहे. तिची तक्रार काहीच नाही. तक्रार काचेची आहे. मग काचेने ठिसूळ का व्हावे. तिने तेवढेच कठीण बनावे. आणि तसे तीला नसेल बनायचे किंवा तिचा गुणच तसा असेल तर तिने स्वतःस वाचवावे. दगडासमोर येऊ नये.
हे उदाहरण हळव्या मनाच्या मुलामुलींना तंतोतंत लागू पडते. बाह्य जग म्हणजे तुम्हाला सांभाळणारे किंवा मनमानी करू देणारे तुमचे घर नाही. जग फार कठोर आहे. तिथे तुमचे कुणी नाही. ते तुमची कधीच कदर करणार नाही. निसर्गाचाही हाच नियम आहे. ‘बळी तो कान पिळी!’ मोठे झाड लहान रोपट्याला त्याच्या छायेखाली जगू देणार नाही. म्हणूनच बाह्य जगात तुम्हाला जगायचे असेल तर भींतीसारखे टणक व्हावेच लागेल. बाह्य जगात जायचे असेल तर काचेचे हृदय घेऊन जाऊ नका. हृदयावर आघात होतील असे अनेक प्रसंग (दगड) तुमच्यावर येणार आहेत. त्यासाठी टचकन फुटणारे काचेचे हृदय तुमच्याजवळ नसावे ते (भिंतिसारखे) कठोरच असायाला हवे.
आपल्या बाळाने ह्या जगात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन मोठे व्हावे असे वाटत असेल तर …
पालकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात
१) ५ ते ७ वर्षापर्यंत जे काही मुलांना संस्कार किंवा विचार द्यायचे असतील ते द्यावेत. त्यासाठी वेळ काढावा. कारणे सांगू नयेत. पालकांनी आपले करिअर त्यादृष्टीने निवडावे. एकदा का मुलाचे लहानपण सरकले की त्यापुढील शिक्षण अनुभवाचे असते. त्यांना येणाऱ्या अनुभवाच्या आधारे आपण फक्त चर्चा करून त्यांच्या विचारांना वळवायचे असते. सक्ती करायची नसते.
२) त्यासाठी त्यांच्याशी रोज थोडावेळ तरी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा माराव्यात. त्यांना पुरेसा वेळ द्यावा. प्रत्येक वेळी त्यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसते. त्यांचेही विचार ऐकावेत. त्यांच्या विचारातच एखादी नवी दिशा असावी, हे विसरू नये.
३) कदाचित त्यांचे विचार तुमच्या अनुभवानुसार वास्तवाला धरून नसतीलही, नुकसान करणारे असतील. परंतु जगरहाटी समजून घेण्यासाठी व स्वतःस शोधण्यासाठी ते भांडवल समजण्यास हरकत नाही. म्हणजेच थोडे आर्थिक नुकसानही सहन करावे. बऱ्याच वेळा १००-२०० रुपयांसाठी पालक वाद घालीत बसतात. त्यातून त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा थोडादेखील विचार पालक करीत नाहीत.
४) बऱ्याच पालकांच्या स्वतःच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मुलांकडून पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. परंतु हे चूक आहे. आपण आपल्या जीवनात योग्य दिशेने जाऊ शकलो नाही त्याची शिक्षा मुलांना कशाला? त्यांना त्यांच्या पिंडा नुसार पुढे जाऊदे. त्यांच्या हातून निसर्गाचे कोणते कार्य होणार आहे याची आपल्याला काय कल्पना?
५) प्रत्येक मुल हे निसर्गाचा एक स्वतंत्र पैलू आहे. त्याला त्याच्या कलेने वाढूदे. “Each person is unic in the world” असे म्हटले जाते. त्याचा ते स्वतःच मार्ग शोधत असते. आपण फक्त त्यास मदत करावी. त्याने काय बनावे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपले स्वतःचेच अस्तित्व इथे किती दिवस आहे याची खात्री देता येईल का? म्हणून प्रत्येकाने फक्त आपले कर्तव्य करावे.
मुलांमध्येही हा विचार रुजवावा. आजच्या युवाने अंतर्मुख होऊन स्वतःला ओळखल्यास तो कधीच विनाकारण मृत्यूला कावटाळणार नाही. उलट विशिष्ट धेय्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरा जाईल. अगदी सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंगासारखा!
दिनेश पेडणेकर, योग शिक्षक, मंडणगड
मोबाईल 9420167413