(रत्नागिरी)
कोकणातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएसएसी परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते मागे पडतात. या परीक्षेत यशस्वी झाले तर आयुष्यच बदलून जाते. विद्यार्थ्यांनी आपल्या हुशारीचा उपयोग करून या स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पहावे, असे आवाहन रत्नागिरीचे वरिष्ठ लेखाधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले. ते नवनिर्माण ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सुकूमार शिंदे, प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. तावडे, प्रा. सचिन टेकाळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारावी बोर्ड परीक्षेमध्ये महाविद्यालयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या साक्षी सागवेकर, सलोनी नाचणकर, तलविया लांबे, झोएब बांगी, निकीता चौधरी, सानिया खतिब, ओंकार चौगुले, प्रदीप कर्पे, संतोषी बाबर यांचा प्रविंद बिरादार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘ कोकणातील विद्यार्थी शिक्षण झाल्यानंतर मुंबई, पुण्यात नोकरीच्या निमित्ताने जातो. कोकणातील विद्यार्थी हुशार असूनही स्पर्धा परीक्षांकडे वळत नाही. आपल्या हुशारीचा उपयोग ते या परीक्षात करत नाहीत. स्पर्धा परीक्षांमध्ये कोणाचीही मोनोपॉली नसते. जात, धर्म, पंथ हा विषय तर दूरच राहिला. विद्यार्थ्यांनी ठरवले तर युपीएससी, एमपीएससी ते क्रॅक करू शकतात. यासाठी मला काही तरी व्हायचंय, असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. सतर्क व्यक्तिमत्व ठेवून स्वत:मधील गुण ओळखणे गरजेचे आहे. मासेमारी विकणारी विद्यार्थीनी डिवायएसपी बनली आहे, अशी अनेक उदाहरणे देत बिरादार यांनी युपीएससी, एमपीएससी परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.