( मुंबई )
सुप्रीम कोर्टात एक अजब प्रकरण दाखल झालं आहे. युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे मी पोलीस भरतीच्या परिक्षेत नापास झालो असा दावा करत एका विद्यार्थ्यानं गुगलकडे 75 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. यासाठी या विद्यार्थ्याने चक्क सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र प्रकरण झालं उलटच सुप्रीम कोर्टानं या विद्यार्थ्याला चांगलेच झापंल आहे. शिवाय कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून दंडही आकारला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद किशोर चौधरी या विद्यार्थ्याने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. त्यानं आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पोलीस भरती आणि राज्य सेवा परिक्षेची तयारी करत होतो. त्यासाठी युट्युबचा वापर करत होतो. पण युट्युबवर वारंवार अश्लील जाहिराती येत होत्या. त्यामुळे लक्ष विचलीत झालं अन् परिक्षेत नापास झालो. त्यामुळे गुगल इंडियानं 75 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असे त्याने याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान आनंद चौधरी याच्या याचिकेवर न्यायमुर्ती कौल म्हणाले की, ‘तुम्हाला जाहिराती पाहायच्या नसतील तर पाहू नका. याप्रकाराच्या याचिका करुन कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायमुर्तीची नाराजी पाहून याचिकाकर्त्याने माफीची मागणी केली. यावर कौल म्हणाले की, ‘दंडाची रक्कम कमी करत आहोत. पण माफी मिळणार नाही.’ कोर्टानं याचिकाकर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावर याचिकाकर्त्यानं बेरोजगार असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यावर कोर्टानं आम्ही कोणत्याही परिस्थितीत दंड वसूल करु, असे कोर्टानं याचिकाकर्त्याला सांगितलं.