(नवी दिल्ली)
भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांना आशियाई स्पर्धेत थेट प्रवेश मंजूर केला आहे. यावर २०वर्षांखालील स्पर्धेतील विश्वविजेती अंतीम पानघळ हिने विनेश फोगटच्या आशियाई खेळ २०२३ साठी थेट पात्रतेबाबत आक्षेप घेतला आहे. फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड चाचणीशिवाय थेट प्रवेश दिल्याबद्दल अंतिम पानघळ हिने नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम पानघळ हिने एका व्हिडिओमध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या चाचणीदरम्यान फोगटसोबत तिची ३-३ लढत झाली आणि तिची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. या फसवणुकीमुळे आता मी कुस्ती सोडायची का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
एका वर्षापासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग न घेता आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगटला थेट प्रवेश मिळाल्याने अंतीम पानघळने विनेश फोगटवर ही टीका केली आहे. ती म्हणाली, मी २०२२ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सच्या ट्रायलमध्येही माझा तिच्याशी ३-३ असा सामना झाला होता. त्यानंतर माझीही फसवणूक झाली. मी कुस्ती सोडावी का? मला फक्त निष्पक्ष चाचणी हवी आहे. मी असे म्हणत नाही की फक्त मीच तिला पराभूत करू शकते, तर अशा अनेक महिला कुस्तीपटू आहेत जे असे करू शकतात.
मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना आशियाई खेळांमध्ये थेट प्रवेश मंजूर केला. या निर्णयामुळे राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षकांच्या मान्यतेशिवाय हा निर्णय घेण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयाला इतर कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.